लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (१९ एप्रिल) पार पडत आहे. देशातील जवळपास १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मतदारसंघांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. असे असतानाही पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये मतदानादरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तसेच भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी लोकांना मतदानापासून रोखल्याचा आरोपही तृणमूलने केला आहे. तर हा आरोप फेटाळत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच दगडफेक केल्याचे भाजपाच्यावतीने सांगितले जात आहे.
दरम्यान, यासंदर्भात तृणमूल काँग्रेसने एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये दिनहाटा, येथील आमचे ब्लॉक अध्यक्ष आय बी अनंत बर्मन यांच्यावर हल्ला झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. यानंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रारी देण्यात येण्याची शक्यता आहे.