संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-रानडुकराने दोन नागरीकांचा घेतला चावा
कामठी ता प्र 9 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कादर झेंडा व जुनी खलाशी लाईन परिसरात रानडुकराने हैदोस घातल्याची घटना काल रात्री साडे आठ दरम्यान घडली असून याप्रसंगी एका 40 वर्षीय महिलेला तसेच एका 22 वर्षीय तरुणाला गंभीर चावा घेतला .जखमींचे नावे अशा राजू वनखेडे वय 40 वर्षे रा जुनी खलाशी लाईन कामठी, शाहिद शेख वय 22 वर्षे रा कादर झेंडा कामठी असे आहे.
प्राप्त माहितीनुसार काल रात्री अचानक सदर घटनास्थळ परिसरात एका रानडुकराने प्रवेश करीत ज्याला त्याला चावा घेण्याचा प्रयत्न करीत हल्ला चढवत असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करीत सैरावैरा पळापळ सुरू झाली होती. दरम्यान या रानडुकराच्या सावटात सदर दोघे जण जख्मि झाले .जखमींना त्वरित शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू आहे.मात्र या घटनेने सर्वत्र भीतीमय वातावरण निर्माण झाले असून भविष्यात या प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती न व्हावी व कुणाची जीवितहानी न व्हावी यासाठी पोलीस प्रशासन विभाग तसेच संबंधित प्रशासनाने दक्षता घेणे गरजेचे आहे.