– नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग
– नागपूरच्या आकाशात भरली धडकी
– प्रवासी उतरले, विमानाची कसून तपासणी
– ६९ प्रवाशांशिवाय चार क्रू मेंबर
नागपूर :- जबलपूरहून शमशाबादच्या दिशेने जाणार्या विमानातील शौचालयात एक टॉयलेट पेपरवर ’ब्लास्ट अॅट ९ एएम’ अशी धमकी मिळाल्याने प्रचंड खळबळ उडाली. नागपूरच्या आकाशात विमान असताना प्रवाशांना धडकी भरली. विमानाची आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आली. बॉम्ब व नाशक पथक, श्वान पथकाने संपूर्ण विमान पिंजून काढल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. या प्रकरणी इंडिगो एअर लाईन्सचे सहायक व्यवस्थापक नोमॅन शेख (४२) रा. सदर, नागपूर यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
इंडिगो एअरलाइन्सचे विमान (६ ई -७३०८) जबलपूर येथून सकाळी ८ वाजता शमशाबादसाठी रवाना झाले. विमानात प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते. नागपूरच्या आकाशात विमान आले. नागपूरची सिमा ओलांडत असताना क्रू मेंबर ममता पटेल ही वॉशरुमला गेली. शौचालयात तिला एक टॉयलेट पेपर चुराळा झालेल्या स्थितीत मिळाला. तिने पेपर उघडून पाहिला असता त्यात ’ब्लास्ट अॅट ९ एएम’ असे इंग्रजी भाषेत लिहिलेले दिसले. बॉम्बची धमकी असल्याने याबद्दल माहिती दिली. लगेच त्यांनी एरिया ट्रॅफिक कंट्रोल, नागपूर यांच्याशी संपर्क साधला. नागपूर विमानतळावर लॅण्ड करण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळताच सकाळी ९.३० वाजता विमान नागपूर विमातळावर लॅण्ड करण्यात आला.
दहा प्रवाशांचे बयान नोंदविले
विमान लॅण्ड होताच सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या प्रकरणाची माहिती सुरक्षा यंत्रणेला देण्यात आली. सीआयएसएफ, शोध व नाशयक पथक, श्वान पथकाकडून विमानाची कसून तपासणी करण्यात आली. यासोबतच सोनेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन मगर यांनी राज्य शासनाचे बीडीडिएस आणि श्वान पथक पाठविले. पथकाने परिसर पिंजून काढला. तपासणीनंतर विमानात बॉम्ब सारखी कोणतीच वस्तू नसल्याचे स्पष्ट झाले. विमानात कुठलाही धोका नसल्याचे सुरक्षा यंत्रणेनेकडून स्पष्ट होताच सुटकेचा श्वास घेतला. नंतर दुपारी ३.३० वाजता विमान शमशाबादसाठी रवाना झाले. तत्पूर्वी सोनेगाव पोलिसांनी दहा प्रवाशांचे बयान नोंदवून घेतले. तसेच नोमॅन शेख यांच्या तक्रारीवरून अज्ञात गुन्हेगाराविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला.