– अमरावती महानगराचा विजयादशमी उत्सव
अमरावती :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्वाला सर्वसंपन्न करण्यासाठी ९९ वर्षापासून निस्वार्थपणे अविरत कार्यरत आहे. आध्यात्माने सर्वांना एकासूत्रात जोडून ठेवले आहे. हिंदुत्व व आध्यात्म ही भारताची ओळख आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अ. भा. कार्यकारणीचे सदस्य डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अमरावती महानगराचा विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन कार्यक्रम रविवार, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी स्थानिक श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजिण्यात आला होता. त्यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून टोंगसे पाटील बिल्डकॉन सोल्युशन प्रा. लि.चे अध्यक्ष श्रीकृष्ण टोंगसे उपस्थित होते. विभाग संघचालक चंद्रशेखर भोंदू, महानगर संघचालक उल्हास बपोरीकर व्यासपीठावर होते.
पुढे बोलताना डॉ. वैद्य म्हणाले, कोरोनाचा कठीण काळ आपण अनुभवला आहे. या काळात शासकीय कर्मचार्यांसह सामान्य नागरिक देखील सेवाकार्यासाठी बाहेर पडले. जगात असे कुठेच घडले नाही. पण, भारतात घडले हे आपले वैशिष्ट आहे. आध्यात्मच त्याचा आधार होता. आध्यात्माने सर्वांना जोडून ठेवले आहे. सत्य, एकता, ईश्वरीत्व, उपासना हे त्याचे चार पैलू आहे. भारताचे राष्ट्र म्हणजे समाज आहे. येथे परकीयांचे आक्रमण झाले, त्यांनी राज्य केले पण, राष्ट्र नेहमी अपराजीत राहीले आहे. समाजाला जागृत करण्यासाठी आध्यात्माच्या आधारावर हिंदुत्वाचे चिंतन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी श्रीकृष्ण टोंगसे म्हणाले, भारत हा भारता सारखा राहीला पाहिजे, यासाठी संघाचे कार्य अविरत सुरू आहे. संघाच्या या कार्याला सर्वांनी बळ द्यावे. संघात सहभागी व्हावे. हिंदुत्वासाठी आपल्याला कार्य करायचे आहे. याशिवाय पुढची पिढी रोजगारभिमुख व्हावी, यासाठी पालकांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख अतिथींचे स्वागत चंद्रशेखर भोंदू यांनी केले. प्रास्ताविक व परिचय महानगर संघचालक उल्हास बपोरीकर यांनी करून दिला.
मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण व त्यानंतर अतिथीच्या हस्ते शस्त्रपूजन झाले. स्वयंसेवकांनी प्रदक्षिणा संचालन, दंड, नि:युद्ध, व्यायाम योग, योगासन, घोष सांघिक गित, शारीरिक प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तत्पूर्वी संपूर्ण गणवेशात स्वयंसेकांचे पथसंचलन श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या प्रांगणातून निघाले होते. मार्गात उपस्थित नागरिकांनी पुष्पवृष्टी करत स्वयंसेवकांचे स्वयंस्फूर्तीने स्वागत केले. उत्सवाला महानगरातील संत व मान्यवर मंडळी, संघप्रेमी नागरिक, माता – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.