Ø जागतिक पर्यटन दिन साजरा ; गुण गौरव समारंभाचे आयोजन
नागपूर :- मानवी जीवनात पर्यटनाचे महत्व अनन्य साधारण असून त्याला सिमेत बांधता येत नाही. पर्यटनातून विविध माहितींच्या खजीन्यासह मानवी स्वभावाचे अनेक कंगोरेही कळतात. पर्यटन वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्हि.एस. सिरपूरकर यांनी आज येथे केले.
जागतिक पर्यटन दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नागपूर यांच्यावतीने पत्रकार क्लब मध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी न्या.सिरपूरकर बोलत होते. ॲड. कुमकुम सिरपूरकर, पर्यटन तज्ज्ञ डॉ. अजय पाटील, ट्रॅव्हल एजेंट असोसियेशनचे प्रमुख गुरमित सिंह विज, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदर सिंह रेणू उपस्थित होते.
न्या. सिरपूरकर म्हणाले, पर्यटनाने मानवी जीवनातील मरगळ जावून नवीनता येते. नव-नवीन भौगोलीक प्रदेशाची ओळख होवून तेथील संस्कृतीचा परिचय होतो. या क्षेत्राच्या वाढीसाठी प्रत्येकाने पर्यटन जगण्याची व तशी मानसिकता घडविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन क्षेत्रात कार्य करणाऱ्या शासकीय व खाजगी संस्थांनी ग्राहक हाच परमेश्वर या भावनेतून आपल्या सेवा द्याव्यात असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी देश व परदेशातील पर्यटनाच्या त्यांच्या आठवणी व गमतीदार किस्से कथन केले.
तेजिंदर सिंह रेणू म्हणाले, राज्य शासनाच्या नवीन पर्यटन धोरणामुळे हॉटेल क्षेत्राला नवी झळाळी मिळाली आहे. या क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रातील तरुण-तरुणींना सुवर्ण संधी आहे. सुरक्षेची काळजी घेऊन साहसी पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
गुरमित सिंह वीज यांनी सांगितले, पर्यटन क्षेत्रात अमाप संधी असून कौशल्य मनुष्यबळाची गरज आहे. पर्यटन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाविन्यपूर्ण संकल्पना भारतात व आपल्या परिसरात राबविण्यावर विचार व्हावा. वैद्यकीय पर्यटनातही (मेडिकल ट्युरिझम) विविध संधी उपलब्ध असून त्याचा प्रसार होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नागपूर यांच्यावतीने पर्यटन क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा तसेच मंडळातर्फे आयोजित चित्रकला आणि छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रतिभा बोदेले यांनी केले. सुत्रसंचालन रेखा गैया तर आभार वैशाली भांडारकर यांनी मानले.