मी कोणतंही वादग्रस्त विधान केलं नाही;‘स्वराज्यरक्षक’ या भूमिकेवर ठाम – अजित पवार

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी आंदोलनाचे षडयंत्र…

मुंबई, दि. ४ जानेवारी :- ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. ‘स्वराज्यरक्षक’ ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून माझ्याविरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात आल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

इतिहास संशोधकांनी या मुद्द्यांवर संशोधन करून वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे मांडणी करावी. खरा इतिहास समोर आणावा. लोकांच्या प्रबोधनासाठी ते उपयुक्त ठरेल. परंतु राजकीय हेतूने राज्यातील वातावरण तापवणे आणि विद्वेषाचे राजकारण करणे कदापि सहन केले जाणार नाही, असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या गेल्या अर्थसंकल्पात पहिल्याच पानावर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक पुणे जिल्ह्यातल्या वढू बुद्रुक आणि तुळापूर येथे करण्यासाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केला. घोषणा करुन आम्ही थांबलो नाही तर, त्यासाठीची आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केली. मी सातत्याने या स्मारकासाठी बैठका घेत होतो, कामाचा आढावा घेत होतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ‘छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार’ योजना आम्ही सुरु केली. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने यासंबंधी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक भारतीय जनता पक्षाला मान्य नाही का ? असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला.

आजपर्यंत कोणत्याही महापुरुषाबद्दल मी वादग्रस्त विधान केलेले नाही. मात्र राज्यपालांसह भाजपचे पदाधिकारी सातत्याने महापुरुषांचा अवमान करत आहेत. मात्र त्याबद्दल ही मंडळी चकार शब्द काढत नाही. महाराष्ट्रातील जनता हे सर्व बघत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर करुन स्वराज्यरक्षक ही भूमिका मी मांडली. माझे इतिहासाचे वाचन आणि आकलन याच्या आधारे माझी जी भूमिका तयार झाली आहे ती मी विधानसभेत मांडली. मी इतिहासाचा संशोधक नाही त्यामुळे त्यासंदर्भात जे तपशीलवार आरोप – प्रत्यारोप होताहेत त्याबाबत युक्तिवाद करणार नाही. तो विषय इतिहास संशोधकांचा, अभ्यासकांचा आहे. नव्या पिढीतील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्याबाबत तपशीलवार विवेचन केले आहे. इतरही अनेकांनी भूमिका मांडल्या आहेत. यापुढेही इतिहास संशोधकांनी त्यावर चर्चा करून वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे मांडणी करत राहावे. लोकांच्या प्रबोधनासाठी ते उपयुक्तच ठरेल. मात्र राज्यपालांसह भाजपच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी राजकीय हेतूने प्रेरित होऊन भाजपने राज्यभर आंदोलन करण्याचे षडयंत्र रचले. राजकीय हेतूने वातावरण तापवणे आणि विद्वेषाचे राजकारण करणे हे जनता कधीही सहन करणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिवासी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन

Wed Jan 4 , 2023
आदिवासींनी विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषध निर्मिती क्षेत्रात व्हावा- डॉ विजयलक्ष्मी सक्सेना नागपूर : जैवविविधता,नैसर्गिक संपदेचे जतन व संरक्षण करणाऱ्या आदिवासी समाजाने विकसीत केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषधनिर्माण कार्यात व्हावा, असे आवाहन राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. विजयालक्ष्मी सक्सेना यांनी आज येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरु असलेल्या 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये शहीद बिरसा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com