-“एक तारीख- एक तास- एक साथ” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर शहर साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने सोमवार (ता.१) सकाळी राबविलेल्या “एक तारीख- एक तास- एक साथ” या अभिनव उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. स्वतःचा परिसर स्वच्छ साकारण्यासाठी शेकडो हात पुढे आले आल्याचे दिसून आले. मनपाच्या दहाही झोन मध्ये कर्मचाऱ्यासह नागरिकांनी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत श्रमदान केले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल नेतृत्वात प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला स्वच्छता कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार मनपाच्या दहाही झोन मधील विविध ठिकाणी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
यात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या पॉल कॉम्प्लेक्स अजनी, दुर्गा माता मंदिराजवळ (प्रभाग १६), अजनी चौक, धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या अंबाझरी उद्यान (प्रभाग १३), हनुमाननगर झोन अंतर्गत येणाऱ्या महेश कॉलनी, चंदन नगर (प्रभाग ३१), धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या कौशल्य नगर (प्रभाग ३३),नेहरूनगर झोन अंतर्गत येणाऱ्या शिवशंकर लाईन, दिघोरी रोड (प्रभाग २८ ),गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या वंदे मातरम उद्यानाजवळ (प्रभाग १९), सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणाऱ्या बांगडे प्लॉट, रेल्वे लाईन जवळ (प्रभाग २१) लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या भवानी नगर (मंदिर) (प्रभाग २५),आशीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या गांधी पुतळा, विनोबाभावे नगर (प्रभाग ३) , मंगळवारी झोन अंतर्गत येणाऱ्या फरास चौक जवळ ताज नगर (प्रभाग १०) येथे नागरिकांनी अस्वच्छ परिसराची साफसफाई करुन परिसर स्वच्छ केला.
रस्त्यावरील पालापाचोळा, झाडाच्या फांद्या आदी उचलून कचरा गाडीत टाकण्यात आले. तसेच स्वच्छ करण्यात आलेला परिसर पुन्हा अस्वच्छ होवू नये, लोक तिथे पुन्हा कचरा टाकू नये म्हणून त्या ठिकाणी संबंधित झोनचे सहायक आयुक्त यांच्या मार्फत जनजागृती करण्यात आली. यावेळी नागरिक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी या सर्वांनी स्वच्छतेसाठी श्रमदानाच्या या उपक्रमात सक्रियपणे सहभाग नोंदविला.