संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आशा व गतप्रवर्तकांच्या मागण्यासाठी कामठीतील आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या कृती समितीच्या वतीने 18 ऑक्टोबर पासून आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी बेमुद्दत संप पुकारण्यात आलेला आहे.या बेमुद्दत संपाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
गटप्रवर्तकांचे कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे सुसूत्रीकरण करून त्यांचे सेवेत समायोजन करावे, ऑनलाईन कामाची जी सक्ती मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर करण्यात येत आहे ती तात्काळ बंद करावी, केंद्र सरकारने मागील पाच वर्षांपासून आशा व गट प्रवर्तकांच्या मानधनात एक रुपयांची सुद्धा वाढ केलेली नाही. आशांना 21 हजार रुपये व गट प्रवर्तकांना 26 हजार रुपये किमान वेतन, दिवाळी भेट म्हणून 5 हजार रुपये बोनस देण्यात यावे यासह इतर अनेक महत्त्वाच्या मागण्यासाठी हा बेमुद्दत संप पुकारण्यात आलेला आहे.या प्रश्नांची सरकारने गांभिर्याने दखल घेत तातडीने सोडवणूक करावी यासाठी कामठी पंचायत समिती कार्यालय ,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय समोर बेमुद्दत धरणे देऊन नारे निदर्शने करणे सुरू आहेत.
सरकार या आंदोलनाबाबत प्रचंड उदासीन असून कुठल्याही प्रकारची गंभीरपणे दखल घेताना दिसत नाही उलट वेगवेगळ्या प्रकारची धमकी वजा पत्र देऊन हा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे .परंतु या धमक्यांना भीक न घालता आशा व गटप्रवर्तक ह्या आपल्या संपावर ठाम असून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार कामठी तील आशा व गटप्रवर्तकांनी केला आहे.