– “उद्यान मित्र” संवाद कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद
नागपूर :- दैनंदिन जीवनात उद्यानाचे अनन्यसाधारण महत्व आहे. उद्यान हे सामाजिक जीवनाचा महत्वाचा भाग झाले आहेत. उद्यानांसह पर्यावरण संवर्धनासाठी मनपा निरंतर कार्यरत आहे. उद्यानांच्या विकासासाठी प्रशासनाला आता उद्यान मित्रांची साथ मिळणार असून, लोकसहभागातून उद्यानांचा अधिक विकास साध्य होईल असा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.
मनपाच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने उद्यानांचा विकास आणि देखभालीकडे लक्ष ठेवणे तसेच नागरिकांना उत्तम प्रकारच्या सुविधा मिळण्याकरिता मनपाद्वारे नेमण्यात आलेल्या “उद्यान मित्र” यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे शुक्रवारी (ता: २७) व्हीआयपी रोड स्थित वनामती सभागृह येथे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी “उद्यान मित्र” यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी मनपाचे उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांच्यास शेकडो उद्यान मित्र प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, शहरातील हरित क्षेत्राच्या विकासासाठी उद्यान आवश्यक आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने मनपाद्वारे विविध पाऊल उचलण्यात येत आहेत. नागरिकांच्या गरजेनुसार उद्यानांमध्ये विकास कामे व्हावीत याकरिता उद्यानात येणारे नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी उद्यान मित्र यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. एका उद्यानासाठी एकापेक्षा जास्त उद्यान मित्र असू शकतात म्हणून उद्यान मित्रांनी एकमेकाच्या सहकार्याने कार्य करावे असेही आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले. याशिवाय शहरातील उद्यानांची माहिती मिळावी व उद्यान संदर्भात तक्रार थेट मनपाच्या उद्यान विभागाकडे पोहोचविता यावी, या उद्देशाने मनपाच्या २६ मोठ्या उद्यानात “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम”लावण्यात आले आहे, याद्वारे प्राप्त सूचनातून उद्यानांमध्ये विकास कामे केली जात आहे. तरी उद्यान मित्रांनीही आपल्या स्थरावर मासिक बैठक बोलून समन्वयाने अभिप्राय नोंदवावे असे आवाहन आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले.
उद्यान मित्र यांच्या कामाच्या स्वरुपाबाबत बोलतांना आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, उद्यानांची दैनंदिन साफसफाई पाहणे, हिरवळीच्या कामावर देखभाल व निगराणी ठेवणे, ग्रीन जीमची देखभाल आणि दुरूस्ती पाहणे, लहान मुलांच्या खेळण्यांची देखभाल आणि दुरूस्ती पाहणे, उद्यानाच्या विकासाची कामे सुचविणे, उद्यानातील कारंजे, स्थापत्य इतर कामांची पाहणी करणे व विकासासाठी अभिप्राय देणे हे प्रमुख कार्य उद्यान मित्र यांना करावे लागणार आहे. उत्तम कार्य करणाऱ्या उद्यान मित्रांना पुढे चालून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्याचा मनपाचा मानस असल्याचेही आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले. याशिवाय उद्यान मित्रांच्या माध्यमातून विकास साध्य झाल्यास हरित शहरांच्या यादीत नागपूर एक क्रमांकाचे शहर म्हणून उदयास येईल असा विश्वास आयुक्त डॉ. चौधरी यांनी व्यक्त केला.
तसेच उपस्थितांशी संवाद साधत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी सांगितले की, सर्वच वयाचे नागरिक उद्यानात येतात, शहरातील उद्यानांमध्ये योग केंद्र, विरंगुळा केंद्र सारखे उपक्रम राबविल्या जातात. अशात उद्यानाचा विकास साधण्यासाठी नागरिकांचा अभिप्राय आवश्यक आहे. नागपूर शहरात सर्वात हरित शहर होण्याची क्षमता असून, सर्वच्या प्रयत्नांनी हे नक्की शक्य होईल असा विश्वास अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी व्यक्त केला. तसेच उद्यान मित्र उपक्रमाला यशस्वी करण्याचे आवाहनही आंचल गोयल यांनी उपस्थिताना केले.
यावेळी बोलताना उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी सांगितले की, उद्यान विभागाकडे लहान, मध्यम, मोठी अशी एकूण १८२ उद्याने असून उद्यानांमधील सुविधा व्यवस्थिती कार्यरत आहेत अथवा नाही याची पाहणी करून वेळेवर आवश्यक दुरूस्त्या सूचविणे व उद्यानातील व्यवस्थेकडे लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांमधूनच उद्यान मित्र नेमण्यात आले आहेत. यातील ३३ मोठ्या उद्यानांसाठी ६०३ उद्यान मित्र यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी सांगितले की, शहराला अधिक पर्यावरण पूरक साकारण्यासाठी उद्यान मित्र यांचे महत्वाचे योगदान राहणार आहे. उद्यान मित्र हे प्रशासनाचे कान, डोळे आहेत. म्हणून त्यांच्या कडून येणाऱ्या विविध सूचना आणि अभिप्राय उद्यानांच्या विकासासाठी महत्वाचे ठरणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद दावडे यांनी केले तर आभार उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी व्यक्त केले.
२६ उद्यानामध्ये फ्लॉवर्स शो
नागपूर महानगरपालिकेच्यावतीने गेल्यावर्षी फ्लॉवर्स शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार आता यावर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान २६ उद्यानामध्ये फ्लॉवर्स शो चे आयोजन करण्याचा मनपाचा मानस असल्याचे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी सांगितेल.