नवी दिल्ली :-दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या गृह मंत्रालयाच्या कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल प्राप्त झाला असल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले. यानंतर तात्काळ बॉम्ब शोधक पथक आणि अग्निशामक बंब घटनास्थळी पाठविण्यात आले. पोलिसांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, नॉर्थ ब्लॉक पोलिसांना धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर डीएफएसने (दिल्ली फायर सर्विस) हालचाल करत बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पाठविले.
पोलिसांनी सांगितले की, आमचा शोध सुरू आहे. आतापर्यंत आम्हाला काहीही संशयास्पद आढळलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये लागोपाठ बॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत. शाळा, विमानतळ, रुग्णालय आणि तुरुंगाना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली गेली आहे.
या धमक्यांचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, रशियाच्या ईमेलवरून या धमक्या दिल्या गेल्या होत्या. आरोपीने व्हिपीएनचा वापर केल्यामुळे त्याच्या आयपी ॲड्रेसचा शोध घेणे कठीण जात आहे. ज्या व्यक्तीने ईमेल तयार केला, त्याला शोधण्यासाठी आम्ही इंटरपोलची मदत घेत आहोत.