नागपूर :- नागपूर हेरिटेज संवर्धन समितीची बैठक गुरुवारी (११ मे) नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत येथील नगर रचना विभाग कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. समितीने कृषी महाविद्यालयाच्या पुरातन इमारतीचे छत दुरुस्तीची कामे करण्यासाठी परवानगी दिली आहे.
बैठकीत वास्तूविशारद अशोक मोखा, समितीचे सदस्य सचिव आणि उपसंचालक, नगर रचना विभाग प्रमोद गावंडे, नागपूर सुधार प्रन्यासचे मेघराजानी आणि नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्र-पाठक डॉ. शुभा जोहरी प्रमुख्याने उपस्थित होते.
डॉ पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय, महाराजबाग नागपूर हेरिटेज सूचीमध्ये ग्रेड १ चे स्थळ असून इमारतीची मालकी शासकीय संस्थेची आहे. कृषी महाविद्यालयाने जीर्ण झालेल्या छताची दुरुस्ती करण्याकरीता हेरिटेज संवर्धन समितीची परवानगी मागितली होती. समिती सदस्यांनी महाविद्यालयातर्फे दिलेल्या प्रस्तावावर सखोल चर्चा करून काम करण्याची परवानगी दिली.
तसेच समितीने राजीव गांधी सद्भाभावना दौड आयोजन समितीला कस्तुरचंद पार्क येथून ऑगस्ट महिन्यात दौड आयोजित करण्याची परवानगी दिली. समितीने शहरातील सर्व हेरिटेज स्थळांचा परिसर अतिक्रमणमुक्त राखला जावा यासाठी मनपाच्या अतिक्रमण विभागाला योग्य निर्देश देण्याचा निर्णय घेतला.