डेंग्युस प्रतिबंध घालण्यास चंद्रपूर मनपास यश

आरोग्य विभाग,स्वच्छता विभागाचे नियोजनबद्ध कार्य  

चंद्रपूर :- डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार रोखण्यास चंद्रपूर महानगरपालिकेस यश आले असुन मागील वर्षी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत आढळलेल्या २६५ डेंग्यु रुग्णांच्या तुलनेत यंदा केवळ ३ सक्रिय रुग्ण मनपा कार्यक्षेत्रात आहेत.

योजनाबद्ध रीतीने कार्य केल्याने डेंग्युला आला घालणे शक्य आहे हे लक्षात घेऊन आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात जुन महिन्यातच प्रतिबंधक व नियंत्रणात्मक उपाययोजनांची सुरवात आरोग्य विभागामार्फत करण्यात आली. मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सर्वप्रथम डासअळी उगमस्थाने शोधुन नष्ट करण्यास कंटेनर सर्वे राबविला गेला ज्यात ३० टक्के घरांमध्ये डासांची अंडी आढळली. हे प्रमाण मोठे असल्याने डेंग्युचा संभाव्य धोका ओळखुन मागील वर्षी ज्या घरांमध्ये रुग्ण आढळले होते ते व संभाव्य दुषित घरे ओळखुन त्या घरांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले.

३५ एएनएम, ७ एमपीडब्लु व १२८ आशा वर्कर, स्वच्छता निरीक्षक यांनी घरोघरी भेट देऊन कुलर, फ्रिज, फिश पॉट, पाण्याची टाकी इत्यादी डासोत्पत्ती स्थाने अबेट द्रावणाद्वारे नष्ट करण्यात आली. डासोत्पत्ती स्थाने आढळणारी घरे, हॉटेल्स, दुकाने इत्यादींनी नोटीस देऊन सक्त कारवाईची ताकीद देण्यात आली. ब्रिडींग चेकर्स द्वारा मनपा हद्दीतील प्रत्येक घरी आतापर्यंत ५ वेळा भेटी देऊन तपासणी केली गेली असुन सदर मोहीम सातत्याने सुरु आहे.

मनपा प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत गप्पी मासे निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आले तसेच नागरिकांना आपल्या घरी गप्पी मासे ठेवण्याचे आवाहन करून मत्स्यविक्री केंद्रांवर ( Fish Aquarium ) गप्पी मासे उपलब्ध करून दिले गेले. 

मनपातर्फे सर्व शाळांना स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड दिले गेले ज्याद्वारे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांना डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचे उगमस्थान व रोगापासुन आपला बचाव कसा करावा हे कळले. शाळकरी मुलांनी आपल्या घरी डेंग्युविषयी जागृती करून मोहीमेस सहकार्य केले. सद्यस्थितीत ११ संशयित डेंग्यु रुग्ण असुन ३ रुग्ण सक्रिय आहेत व त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पावसाळा पुर्णपणे संपेपर्यंत नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे व डास उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com