मेहता काटा चौक ते जलराम नगरपर्यंत वाहतूक प्रतिबंधित

मनपा आयुक्तांचे आदेश: १५ जानेवारी २०२३ पर्यंत एकतर्फी वाहतूक बंद

नागपूर :- सिमेंट रोडच्या बांधकामाकरिता लकडगंज झोन अंतर्गत मेहता काटा चौक ते जलराम नगर पर्यंत वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प अंतर्गत मेहता काटा चौक ते जलराम नगर पर्यंत सीमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने १ नोव्हेंबर २०२२ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये उपरोक्त मार्गावरून कोणत्याही वाहतुकीस उजव्या बाजुकडील मार्ग बंद करण्यात येईल. सदर मार्गावरून डाव्या बाजूने वळविण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी आदेश दिले आहे.

याशिवाय काम सुरू असलेल्या ठिकाणी महत्वाच्या उपाययोजना करण्याचेही आयुक्तांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलक लावून काम सुरू झाल्याची व पूर्ण करण्याची दिनांक नमूद करणे. कंत्राटदाराने स्वतःचे नाव व संपर्क क्रमांकाचे फलक लावणे, पर्यायी मार्ग सुरू होण्याच्या व संपण्याच्या ठिकाणी तसेच बॅरिकेड्स जवळ सुरक्षा रक्षक किंवा स्वयंसेवक नेमावे. वाहतूक सुरक्षा रक्षक, वाहतूक चिन्हाचा पाट्या, कोन्स, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, एजईडी बॅटन, ब्लिकर्स आदी संसाधने उपलब्ध करावे. काम सुरू झाल्यानंतर जमीनीतून निघणारी माती, गिट्टी आदी रस्त्यावर टाकू नये. मार्गावरील रस्त्यावर झालेले खड्डे तात्काळ बुजवावे. पर्यायी मार्गाच्या ठिकाणी वळण मार्गाचे सविस्तर माहिती फलक लावणे, रात्रीच्या वेळी एलईडी डायव्हर्शन बोर्ड लावणे, बॅरिकेड्स वर एलईडी माळा लावणे आदी बाबत काटेकोरपणे काळजी घेण्याचे सुद्धा आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com