नागपूर : देशाचे केंद्रबिंदू असणाऱ्या नागपूरच्या ऐतिहासिक ‘झिरो माईल’ चे सौंदर्य आणखी खुलणार आहे. नागपूर हेरिटेज संवर्धन समितीने नागपुरातील महत्वाच्या ऐतिहासिक झिरो माईलच्या सुशोभीकरण संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता प्रदान केली आहे.नागपूर हेरिटेज संवर्धन समितीची बैठक मंगळवारी (ता १०) रोजी नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या नगर रचना विभाग येथे संपन्न झाली. बैठकीत नागपुरातील क्रेडाई संस्थेच्या झिरो माईलच्या संपूर्ण विकास, देखभाल आणि दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली. आता हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला जाईल. येत्या मार्च महिन्यात जी २० ची महत्वाची बैठक नागपूर मध्ये आयोजित करण्यात आली आहे, त्यापूर्वी झिरो माईल स्तंभाचा सुशोभीकरण, संवर्धन आणि जतन करण्यासंदर्भातील महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूर हेरिटेज संवर्धन समितीची बैठक अध्यक्ष वास्तुविशारद अशोक मोखा यांचा अध्यक्षेत पार पडली. या बैठकीत प्रमोद गावंडे, उपसंचालक नगर रचना आणि सदस्य सचिव, नागपूर हेरिटेज संवर्धन समिती, पी एस पाटणकर, शुभा जोहरी, ए पी मोरे, ए पी बडगे, पंकज पराशर, पराग नगराळे, नंदकिशोर ढेंगळे, क्रेडाई संस्थेचे अभिषेक जव्हेरी, हेमंत नागदिवे, गौरव अग्रवाल, दिनेश भोजवानी उपस्थित होते.
झिरो माईलचा सुशोभीकरण, संवर्धन आणि संरक्षण करण्याचा प्रस्ताव क्रेडाई संस्थेकडून नागपूरचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांनी या प्रस्तावावर हेरिटेज संवर्धन समितीला आपली मान्यता देण्याबाबत सुचित केले होते. झिरो माईल स्तंभलागत सेंड स्टोनचे चार घोडे आणि एक दगडी हेरिटेज स्तंभ असून, चार घोड्यापेकी दोन घोडे अंशतः क्षतिग्रस्त झाले आहे. क्रेडाई संस्थेने या हेरिटेज स्तंभाचा विकास, सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यांचा प्रस्तावावर हेरिटेज समितीच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. या स्तंभाच्या जवळची जागा सुद्धा विकसित केली जाणार आहे. तसेच माननीय उच्च न्यायालय यांनी सुद्धा हेरिटेज वास्तूचे संरक्षण व संवर्धन करण्याचे निर्देश दिले होते. त्या दृष्टीने सुशोभीकरण झाल्यामुळे नागपूरला वेगळे महत्व प्राप्त होईल.