डॉ.आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी गरजूंना मदत – सुनील केदार

– सावनेर येथे डॉ. बाबासाहेबांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी
–  26 लाभार्थ्यांना 57 लाखाच्या सानुग्रह अनुदानाचे वाटप
नागपूर दि. 14 : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित,शोषित, पीडीत, गरीब, दीनदुबळे आणि सर्व स्तरातील जनतेसाठी अहोरात्र कार्य केले. समाजहिताचे कार्य करतांना त्यांनी कधीही भेदाभेद केला नाही. त्यांची 131 वी जयंती सावनेर तहसील कार्यालयामध्ये सामजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात आली. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी समाजातील सर्व घटकांना शासनातर्फे मदतीचा सानुग्रह लाभ देण्यात येत असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.
सावनेर तहसील कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छोटेखानी कार्यक्रमात 57 लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचे धनादेश श्री केदार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पंचायत समितीच्या सभापती अरुणा शिंदे, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, तहसीलदार प्रताप वाघमारे, उपअभियंता निमजे,नायब तहसीलदार कोहळे तसेच अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
केदार पुढे म्हणाले की, आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर गरीबांसाठी जगले, त्यांचे हे विचार आपणास प्रेरणा देतात. त्यानुषंगानेच त्यांच्या जयंतीनिमित्त गरीब व गरजु महिलांना अनुदानाचे वाटप करण्यात आले. ही त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.
कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र हाहाकार माजला होता, त्याकाळात सर्व व्यक्ती जाती, धर्म, भेदभाव विसरुन एकमेकांना सहाय्य करीत होते.भारतीय स्वातंत्र्य लढयात जसे लोक लढले त्यांची प्रचिती यावेळी आली. एकमेकांचा असलेला द्वेष विसरुन असेच एकमेकांना सहाय्य करण्याची भावना नेहमी मनात ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
द्वेष विरहीत राष्ट्राची भावना ही आज मूलभूत गरज आहे. तसेच देश संघटीत राहील. जयंती साजरी करतांना महापुरुषांच्या विचारांचे चिंतन करणे गरजेचे आहे. गोरगरीब जनतेच्या संकटकाळात शासन नेहमी पाठीशी आहे, असे ते म्हणाले. भारतीय घटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समता व बंधुतेचा मंत्र आपणास दिला त्यांचे पालन करणे म्हणजेच त्यांची जयंती सार्थ ठरेल., असे त्यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक न्याय दिनाच्या निमित्त कोराना महामारी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची विधवा पत्नी शिला प्रकाश गजभिये हिला 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी प्रतिभा दुधे हिला 1 लाख रुपयांच्या अनुदानासह राष्टीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत एकूण 24 महिला लाभार्थ्यांस अनुदानाचे वाटप केदार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिव्यांग लाभार्थी लकी योगेश कोचे यास शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्यातर्फे आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास लाभार्थी महिला, नागरिक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कॅन्सरग्रस्त मुलीला आर्थिक सहाय्य

Thu Apr 14 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 14:- विहीरगाव येथील १४ वर्षीय मुलगी कर्करोगाने ग्रस्त होती. तिला आर्थिक सहाय्य निधी जिल्हा परिषद अंतर्गत १५,००० रु. मिळवून देण्यासाठी सत्ता पक्ष नेता तथा सदस्य जि.प. नागपुर प्रा अवंतीकाताई लेकुरवाडे यांनी विशेष प्रयत्न केले व धनादेश वितरीत केला. याप्रसंगी माजी . उपाध्यक्ष जि.प. नागपुर मनोहर कुंभारे, विरोधी पक्ष नेता जि.प. नागपुर आतिष उमरे,आणि मुलीचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com