राज्यात पुन्हा उष्णतेच्या झळा; ‘थंड हवेची ठिकाणे’ही उकाड्याने हैराण, पर्यटकांची निराशा

अमरावती :- हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागांत रविवारी उष्णतेची लाट परतली. अनेक भागांत कमाल तापमानाचा पारा ३५ ते ४० अंशांच्या वर गेल्यामुळे काहिली वाढली आहे. उन्हाळय़ाच्या सुट्टीत अनेकांची आवडती थंड हवेची ठिकाणे, महाबळेश्वर आणि माथेरानमध्येही उकाडा वाढल्यामुळे शनिवारी-रविवारी तेथे गेलेल्यांची निराशा झाली. दुसरीकडे अमरावती विभागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले असून महिनाभरात टँकरग्रस्त गावांची संख्या दुप्पट झाली आहे.

काही दिवसांपूर्वी विदर्भाच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. मात्र त्यानंतर आता उकाडय़ाने जीवाची काहिली सुरू झाली असून पाणीटंचाईच्या झळा अधिकाधिक जाणवू लागल्या आहेत. गर्तेत सापडलेल्या पश्चिम विदर्भातील गावांची संख्याही तितक्याच झपाटय़ाने वाढत आहे. साधारणत: महिनाभरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणाऱ्या गावांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असून त्यामुळे त्याच प्रमाणात टँकरची संख्याही विस्तारली आहे. सद्यस्थितीत विभागातील टँकरचा आकडा ५५ पर्यंत पोहचला आहे. अमरावती विभागात २८ मार्च रोजी २६ गावांना २६ टँकरने पाणीपुरवठा होत होता.परंतु, ऊन तापू लागल्यानंतर रविवापर्यंत टँकरग्रस्त गावांची संख्या ५१ झाली आहे. सर्वाधिक ४७ टँकर बुलढाणा जिल्ह्यात असून अमरावती जिल्ह्यातील ४ गावांमध्ये ७ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात एका गावात टँकर सुरू झाला आहे. अद्याप संपूर्ण मे महिना बाकी असल्याने दुष्काळाच्या कचाटय़ात सापडणाऱ्या गावांची आणि पर्यायाने टँकरची संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. ग्रामीण भागांत नदी, नाले, ओहोळ कोरडेठाक पडले असून लहान बंधारे, धरणेही कोरडी झाली आहेत. अशा स्थितीत गावांना केवळ विहिरींचा आधार होता. आता तोही संपुष्टात येऊ लागला आहे.

सोलापुरात सर्वाधिक तापमान

राज्यातील सर्वाधिक सरासरी कमाल तापमानाची नोंद रविवारी ४३.७ अंश सेल्सिअस सोलापूर येथे झाली. जळगाव (४२.२), मोहोळ (४२.५), नांदेड (४२.४), सांगली (४१), सातारा (४०.५) येथेही तापमान अधिक होते. कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ येथे कमाल व किमान तापमानात वाढ झाली. काही भागात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती सभांनी महाराष्ट्र ढवळून निघणार

Mon Apr 29 , 2024
– 29 व 30 एप्रिल रोजी महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या 6 सभांचे आयोजन – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती नागपूर :-लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत 29 व 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा सभा होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी दिली. मोदी यांच्या सोमवारी आणि मंगळवारी प्रत्येकी तीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!