-साखर झोपेत पडला वरच्या बर्थवरून
-यशवंतपूर एक्सप्रेसमधील घटना
-मेयोत प्लॅस्टर, डॉक्टरांनी दिला शस्त्रक्रियेचा सल्ला
नागपूर :-साखर झोपेत अचानक तो वरच्या बर्थवरून खाली पडला. त्याचा एक हात फ्रॅक्चर झाला. असह्य वेदनेने तो तडफडत होता. औषधाविना त्याने संपूर्ण रात्र वेदना सहन करीत काढली. नागपुरात गाडी येताच त्याला मेयो रुग्णालयात आणले गेले. डॉक्टरांनी प्लॅस्टर करून शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. ही घटना यशवंतपूर-बरौनी एक्सप्रेसमध्ये मध्यरात्री घडली.
आयुष (9) असे त्या चिमुकल्याचे नाव आहे. वडील मनीषकुमार गुप्ता मूळचे पाटण्याचे आहेत. सध्या कुटुंबासह बंगळुरूत राहतात. चालक म्हणून कामाला आहेत. भावाच्या लग्नासाठी संपूर्ण कुटुंब पाटण्यासाठी निघाले होते. यशवंतपूर-बरौनी एक्सप्रेसच्या एस-8 बोगीत 71, 72 अशा दोन बर्थ आरक्षित होत्या. 9 वर्षांचा आयुष आणि त्याचे वडील वरच्या बर्थवर, तर आई आणि दोन मुले खालच्या बर्थवर झोपली.
मध्यरात्री वडील लघुशंकेला गेले. त्याच दरम्यान आयुष वरच्या बर्थवरून खाली पडला. मोठ्याने आवाज झाल्याने आईसह बोगीतील प्रवासी खडबडून जागे झाले. आयुष हाताच्या भारावर पडल्याने त्याचा एक हात हलत नव्हता. प्रचंड वेदनेमुळे तो कण्हत होता. त्याच्या तोंडून शब्द निघत नव्हता. डॉक्टर नाही, औषध नाही, त्यामुळे आयुषच्या वेदना वाढतच होत्या. मुलाच्या वेदना पाहून आई-वडीलही चिंतेत पडले. काय करावे, कुठे जावे, रात्र कशी काढावी याच विचारात त्यांनी आयुषला धीर दिला.
बुधवार, 12 एप्रिलला दुपारी 2 वाजताच्या सुमारास नागपूर स्थानकावर गाडी येताच लोहमार्ग पोलिसांना माहिती देण्यात आली. सहायक पोलिस उपनिरीक्षक ऑज्वेल्ड थॉमस यांनी घटनास्थळी जाऊन आयुषला मेयो रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी एक्स रे काढून हात फ्रॅक्चर असल्याचे निदान केले तसेच प्लॅस्टर करून शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.