Ø सेंद्रीय शेती प्रमाणिकरणावर शेतकऱ्यांचे प्रबोधन
Ø शेळी पालन, मानव वन्यजीव संघर्षावर चर्चासत्र
यवतमाळ :- येथील समता मैदानात आयोजित जिल्हा कृषि महोत्सवात शेतकऱ्यांसाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. बांबुची व्यावसायीक लागवड व मुल्यवर्धन, सेंद्रीय शेती प्रमाणिकरण, शेळी पालन व्यवसाय व मानव व वन्यजीव याविषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले.
वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय इरोलकर यांनी बांबुची व्यवसायीक लागवड व मुल्यवर्धन या विषयावर तांत्रिक मार्गदर्शन केले. इरोलकर यांनी बांबूच्या विविध जाती, बांबूची लागवड, लागवडीनंतरची निगा व बांबू लागवडीचे फायदे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या सत्रामध्ये चेतना ऑरगॅनिकचे अजय कोकेवार यांनी सेंद्रीय शेती प्रमाणिकरण या विषयावर मार्गदर्शन केले.
त्यानंतरच्या सत्रामध्ये कृषि विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे ता. दारव्हा येथील विषय विशेषज्ञ देवानंद राऊत यांनी शेळी पालन व्यवसाय या विषयासंबंधी मार्गदर्शन केले. शेळी पालन, शेळीच्या विविध प्रजाती, शेळीच्या आरोग्याची निगा, चारा व्यवस्थापन व विक्री व्यवस्था या विषयावर मार्गदर्शन केले.
वन्यजिव अभ्यासक यादव तरटे यांनी मानव व वन्यजीव संघर्ष याची कारणे व उपाय योजना यावर मार्गदर्शन केले. अमरावती येथील सनदी लेखापाल दिपक झंवर यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, त्या संबंधीचे विविध कायदे व त्याचे अनुपालन तसेच शेतकरी उत्पादक कंपनीसाठी असलेल्या केंद्र शासनाच्या व राज्य शासनच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.