– शुभम पवार यांनी जिल्ह्याचा लौकीक देशात वाढविल्याचा अभिमान – ना. राठोड
यवतमाळ :- अत्यंत खडतर अशा केंद्रीय लोकसेवा आयोगा (युपीएससी) च्या परीक्षेत देशात ५६० वी रँक मिळवून यवतमाळ जिल्ह्याचे सुपूत्र शुभम सुरेश पवार यांनी जिल्ह्याला देशभरात लौकीक मिळवून दिला. त्यांच्या यशाने जिल्ह्यातील तरूणांना स्पर्धा परीक्षेतील यशाची प्रेरणा मिळाली आहे, असे कौतुकोद्गार राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी काढले.
शुभम पवार यांच्या या यशाबद्दल पालकमंत्री संजय राठोड यांनी आज महागाव येथे त्यांच्या घरी जावून यथोचित सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. यूपीएससी परीक्षेच्या नुकत्याच लागलेल्या निकालात शुभम सुरेश पवार यांनी देशात ५६० वी रँक मिळवली. अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या परीक्षेत यश मिळवून शुभमने या परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो परीक्षार्थींना प्रोत्साहन दिले, असे ना. संजय राठोड यावेळी बोलताना म्हणाले. आपणही आपल्या भागातील परीक्षार्थींसाठी आधुनिक आणि सर्व सोयीयुक्त अभ्यासिका तसेच ग्रंथालयांमध्ये आवश्यक पुस्तके उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील अधिकाधिक मुले – मुली प्रशासकीय सेवेत येऊ शकतील, असे ना. संजय राठोड यावेळी म्हणाले.
शुभमचे वडील पुसद शहर पोलीस ठाण्यात हेडकॉन्स्टेबल आहेत. उमरखेड तालुक्यातील वालतूर येथील मूळ रहिवासी असलेले पवार कुटुंबीय सध्या महागाव येथे वास्तव्यास आहे. शुभमच्या सत्कारप्रसंगी त्यांची आई संगीता पवार, आजोबा दयाराम पवार, आजी शांताबाई पवार, भाऊ भूषण पवार (तलाठी) आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे महागाव येथील डॉ. बी. एल. चव्हाण, राजू राठोड, रामराव नरवाडे, पवन राठोड, लखन राठोड, रामभाऊ तंबाके, रविंद्र पवार, यवतमाळ युवा सेनेचे महेश पवार, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.