नागपूर :- विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढावी तसेच वाचनाची आवड निर्माण व्हावी यातून त्यांच्यात वैचारिक प्रगल्भता निर्माण होऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन यावे. या उदात्त हेतूने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर इतिहास विभागात वाचन संस्कृती अभियान राबविण्यात आले.
अलीकडे विद्यार्थी पुस्तकांपासून दूर जात आहे. आजच्या पिढीचा डिजिटल माध्यमातून वाचनाचा कल वाढलेला आहे. हे खरे असले तरी माणसाची ज्ञान लालसा पुस्तक वाचनानेच पूर्ण होऊ शकते. एखाद्याचे जीवन बदलण्याचे सामर्थ्य एका चांगल्या पुस्तकात असू शकते. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ज्ञान स्त्रोत केंद्र पी. व्ही. नरसिंहराव लायब्ररी विद्यापीठ परिसर येथे बुधवार, दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान ग्रंथ प्रदर्शनी व पुस्तकाचे सामूहिक वाचन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
इतिहास विभाग प्रमुख डॉ. शामराव कोरेटी आणि विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनीला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विषयावर उपलब्ध असलेल्या पुस्तकांची माहिती जाणून घेतली. विविध क्षेत्रातील नामवंत लेखकांची लिहिलेल्या पुस्तकांविषयी माहिती घेतली. तसेच अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षा विषयी उपलब्ध असलेल्या पुस्तकांविषयी जाणून घेतले. ग्रंथ प्रदर्शनीला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानलालसा निर्माण झाली आणि अनेक नवीन पुस्तकांच्या वाचनाविषयी संकल्प केला. ज्ञान स्त्रोत केंद्रातील वाचन कक्षात विद्यार्थ्यांद्वारे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी डॉ. कोरेटी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात वाचनाने माणसाचे जीवन समृद्ध होते. प्रत्येकाने नियमित वाचन केले पाहिजे. तसेच यशस्वी पुरुषांचे आत्मचरित्र वाचले पाहिजे यातून स्वतःच्या जीवनात परिवर्तन घडवून येऊ शकते. असे मत मांडले. ज्ञान स्त्रोत केंद्रातील लायब्ररी असिस्टंट श्री पुरुषोत्तम दाढे आणि श्रीमती सुरेखा तूपोणे यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालयाविषयी असलेल्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली.