विकासाचे स्वप्न होणार साकार, पुन्हा मोदी सरकारच सत्तेत येणार – नंदूरबार येथील प्रचंड सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

नंदूरबार :-बारामती मतदारसंघातील मतदानानंतर पराजयाच्या भीतीने शरद पवारांनी आपला पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी सुरू केली असून नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेनेसोबत जाऊ नका, खोट्याची साथ देऊ नका, मोदींना मत द्या आणि विकासाचे स्वप्न साकार करा, असे आवाहन नंदुरबार येथे प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. आज अक्षय्य तृतीयेचा सण आहे आणि आज खूप लोक आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. अक्षय्य तृतीयेचे आशीर्वादही चिरंतन आहेत, त्यामुळे देशात पुन्हा एकदा सरकार स्थापन होणार हा तुमच्या आशीर्वादाचा स्पष्ट अर्थ आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी भाजपाच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. भाजपा – महायुतीच्या उमेदवार खा. डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी झालेल्या या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. अमरीश पटेल, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आदी उपस्थित होते. 

मोदी म्हणाले की, आदिवासींची सेवा ही कुटुंबाची सेवा आहे. या भागात जंगलात राहणाऱ्या लोकांना पाणी आणि विजेची खूप समस्या होती. पण आमच्या सरकारने तो प्रश्न सोडवला असून पीएम आवास अंतर्गत 1.25 लाख लोकांना घरे देण्यात आली आहेत. आता जी कुटुंबे यापासून वंचित आहेत अशांचा शोध घ्या तसेच ज्या कुटुंबांना गॅस, घर किंवा पाणी मिळालेले नाही त्यांची नावे पाठवा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. आपल्या सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये तीन कोटी लोकांना कायमस्वरूपी घरे मिळतील, या हमीचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. सध्याची कामे हा फक्त ट्रेलर असून अजूनही लोकांसाठी खूप काही करायचे आहे असे ते म्हणाले. आदिवासी भागातील एक मोठी समस्या असलेल्या सिकलसेल ॲनिमियासाठी काँग्रेसने काहीही केले नाही. या आजाराचा कायमचा नायनाट करण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे ते म्हणाले. कुपोषण ही आदिवासी समाजातील समस्या असली तरी ही समस्यादेखील आम्ही कायमची संपविणार आहोत. यापुढे कुपोषणाचा एकही बळी होऊ नये, यासाठी येथील 12 लाख लोकांना मोफत रेशन देण्यात आले आहे, असेही मोदी म्हणाले.

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नकली शिवसेनेचाही जोरदार समाचार घेतला. काँग्रेस सतत खोटे बोलत असून धर्माच्या आधारे आरक्षण देऊन काँग्रेसने संविधानाच्या पाठीत वार करण्याचे पाप केले आहे, असा आरोप त्यांनी केला. आदिवासी, मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकावून ते अल्पसंख्याकांना देण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट असून कर्नाटकातील मुस्लिमांना रातोरात मागास करण्यात आले, त्याप्रमाणे कर्नाटकचे मॉडेल संपूर्ण देशात लागू करण्याचा काँग्रेसचा कट आहे. ही महाविकास आघाडी आरक्षण खाऊन टाकण्याची मोठी मोहीम राबवत आहे, असा आरोप करून मोदी म्हणाले, एससी, एसटी, ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी मी महायज्ञ करत आहे. आरक्षणाचे तुकडे करणार नाही आणि त्यातील कोणताही भाग मुस्लिमांना देणार नाही, याची ग्वाही काँग्रेसने द्यावी अशी आमची मागणी होती, परंतु मात्र काँग्रेसकडून याला प्रतिसाद मिळाला नाही. जोपर्यंत मोदी जिवंत आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही धर्माच्या आधारे एससी, एसटी आणि ओबीसींचे एक टक्काही आरक्षण घेऊ देणार नाही, या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही, असा इशाराही मोदी यांनी दिला.

काँग्रेसने स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासींचे योगदान विसरून स्वातंत्र्याचे संपूर्ण श्रेय एकाच कुटुंबाला दिले. स्वातंत्र्यात आदिवासींचे योगदान दर्शविण्यासाठी आम्ही एक संग्रहालय बांधत आहोत. आम्ही पहिल्यांदा एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवले. मात्र एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती होण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसने रात्रंदिवस काम केले, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या राजकारणावर कोरडे ओढले. राहुल गांधींचे परदेशात राहणारे गुरू सॅम पित्रोदा हे वर्णभेद पाळतात, ज्यांचा रंग कृष्णासारखा आहे त्यांना काँग्रेस आफ्रिकन मानते, आणि काँग्रेस आदिवासींचा बदला घेण्यासाठी रंगांची चर्चा करते, अशी टीकाही मोदी यांनी केली.

श्री राम हे भारताच्या भविष्याचे प्रेरणास्थान आहेत. दान किंवा इतरांची सेवा करण्यापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही आणि एखाद्याला दुखावणे हे सर्वात मोठे पाप आहे, ही रामाची शिकवण आहे, मात्र आदिवासींची सेवा करणाऱ्या रामाला काँग्रेस विरोध करते, असे ते म्हणाले. बारामती मध्ये झालेल्या मतदानानंतर शरद पवार हे चिंतेत आहेत. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करूनच काँग्रेसमध्ये विलीन होण्याची तयारी चालविली आहे. चार जूनच्या निकालानंतर नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार हे लक्षात ठेवा आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपले स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधान मोदी यांनी भाषणाचा प्रारंभ मराठी संबोधनाने केला. देवमोगरा मातेच्या भूमीला, आदिवासी सेनानी राघोजी भांगरे ,जननायक कृष्णाजी साबळे, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना प्रणाम असे म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात केली. अक्षय्य तृतियेच्या शुभकामना देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की या शुभदिनी जे प्राप्त होते ते अक्षय्य असते आणि आज मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आला आहात. तुमचे अक्षय्य आशीर्वाद गरजेचे असून ,पुन्हा एकदा?….पुन्हा एकदा? ….असे मराठीतून मोदी यांनी विचारले असता प्रचंड गर्दीतून मोदी सरकार असा आवाज घुमला. नंदुबारच्या स्मृतींना उजाळा देत पंतप्रधान मोदी म्हणाले की नंदुरबारला येऊन चौधरीचा चहा प्यायलो नाही असे केवळ अशक्यच, असे म्हणत त्यांनी नंदुरबारवासीयांशी आपुलकीने संवाद साधला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

"कृत्रिम पहाड़ी बनाने का ठेका भारत सरकार से WCL ने लिया क्या ?

Fri May 10 , 2024
– “WCL प्रबंधन सर्वोपरि है क्या ? – M.O.D.I. FOUNDATION  नागपुर :- M.O.D.I. FOUNDATION ने कामठी कॉलरी ओपन से निकलने वाली मिट्टी का संग्रह किया जा रहा है जो आज विशालकाय पर्वत का रूप ले चुका है जिससे KANHAN परिक्षेत्र के पिपरी,धर्मनगर,अशोकनगर,सुरेशनगर,रायनगर,कान्द्री,टेकाडी,गोंडेगांव,घाटरोहना,जुनी कामठी एवं कन्हान नगर के रहवासी क्षेत्र के निवासियों के लिए गंभीर खतरा उत्पन्न हो गया है. इस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com