चंद्रपूर :- माझी माती माझा देश व हर घर तिरंगा अभियानातंर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शनिवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता गांधी चौक आझाद बगीचा दरम्यान भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन व आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन रॅलीस प्रारंभ करण्यात आला. सर्व शालेय मुलांनी हातात राष्ट्रध्वज उंचावुन मनपा कार्यालय गांधी चौक येथुन आझाद बगीचापर्यंत मार्गक्रमण केले. याप्रसंगी विविध घोषणांद्वारे विद्यार्थ्यांनी परिसर दणाणुन सोडला. गांधी चौक ते आझाद बगीचापर्यंत रॅलीचा मार्ग होता, आझाद बगीचा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला व पंचप्रण शपथ घेण्यात आली.
या रॅलीत शहरातील छोटुभाई पटेल शाळा,एफईएस गर्ल्स, सिटी कन्या, हिंदी सिटी, सिटी माध्यमिक लोकमान्य टिळक विद्यालय,लोकमान्य शाळा,न्यू इंग्लीश, किदवई तसेच नूतन माध्यमिक अश्या १० शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच मनपा अधिकारी – कर्मचारी व शाळांतील हजार विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग होता.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मनपातर्फे विविध कार्यक्रम घेतल्या जात आहेत. तिरंगा रॅलीद्वारे नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. या वर्षी सुद्धा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.