मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी शासन वचनबद्ध : देवेंद्र फडणवीस

विदर्भ साहित्य संघाला शताब्दी वर्षात १० कोटी निधी जाहीर

वर्धा : कोणत्याही भाषेचे संगोपन होण्यासाठी तिचा वापर ज्ञानार्जनासाठी होणे आवश्यक आहे.तंत्रज्ञान, विज्ञान आणि ज्ञानावर आधारीत सर्व क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी,मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. विदर्भ साहित्य संघाला शताब्दी वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने त्यांनी यावेळी दहा कोटी रुपयांच्या निधीची घोषणाही केली.

मराठी सारस्वतांच्या उपस्थितीत वर्धा येथे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. समारोपीय दिवसाच्या शुभारंभ सत्रात आपल्या शुभेच्छा संदेशांमध्ये त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याच्या पुनरुच्चार केला.

गेल्या काही वर्षामध्ये भाषा संवर्धनात आलेला ऱ्हास भरून निघेल.आता केंद्र शासनाने नवीन शिक्षण निती तयार केली असून इंग्रजीऐवजी आता मराठी भाषेत सर्व ज्ञान आधारित अभ्यासक्रम तयार केले जातील. मराठी आता व्यवहारातील ज्ञानभाषा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मेघे इन्स्टिट्यूटमध्ये मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर केंद्र शासनाच्या भारतीय संस्कृती संशोधन परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष उषाताई तांबे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, महामंडळाचे कार्यवाह उज्वला मेहेंदळे, खा. रामदास तडस, खा.अनिल बोंडे, आ.समीर मेघे, आ.समीर कुणावार, आ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सागर मेघे व साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या कर्मभूमीत होत असलेल्या आयोजनाचा विशेष आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले,स्वातंत्र्याचा लढा असो,भूदान चळवळ असो,शेवटच्या माणसाला न्याय देण्याचे काम या भूमीतूनच झाले आहे.संपूर्ण स्वराज्याची मागणी येथे झाली होती.रामराज्य, सुराज्याच्या शाश्वत विचारांचा संदेश याच भूमीतून दिला गेला.त्यामुळे साहित्य संमेलन येथे होणे अतिशय औचित्यपूर्ण आहे.थोडक्यात स्वातंत्र्याची ‘ब्ल्यू प्रिंट ‘, तयार करणारी ही भूमी आहे.

साहित्याच्या व्यासपीठावर राजकीय नेतृत्वाचे काय काम ? हा नियमित प्रश्न विचारला जातो. मात्र साहित्य निर्मितीत राजकीय व्यक्तिमत्व किती महत्त्वपूर्ण ठरतात याचे खुमासदार वर्णन त्यांनी यावेळी केले.

वर्धा साहित्य संमेलनात प्रत्येक मंच वैदर्भीय साहित्यिकांना समर्पित आहे. याची नोंद उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात घेतली. प्राचार्य राम शेवाळकर यांच्या नावाने मुख्य व्यासपीठ आहे. ते म्हणाले प्रा. राम शेवाळकर यांचे व्याख्यान ऐकणे, ही ज्ञानवर्धक बाब होती. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, महेश एलकुंचवार, आशा बगे, आशा सावदेकर यांच्यासारख्या साहित्यिकांनी विचाराची प्रेरणा दिली आहे. कवीवर्य सुरेश भट यांनी मराठीला गझल देऊन भाषेला उंचीवर पोहचवले, कविवर्य ग्रेस यांनी तर तरुणाईला वेड लावले होते. त्यामुळे विदर्भाच्या भूमीत साहित्य संमेलनाचे आयोजन आनंददायी असल्याचे त्यांनी सांगितले.

साहित्य संमेलनासोबतच नव माध्यमांची मुबलक उपलब्धता अभिव्यक्तीचे नवे दालन म्हणून पुढे येत आहे. मात्र नवमाध्यमांमुळे नव साहित्यिक वेगळी अभिव्यक्ती प्रदर्शित करीत असले तरी मात्र उंची आणि खोलीचे साहित्य पुस्तकातून अभिव्यक्त होते. त्यामुळे आजही पुस्तकांचे संदर्भ महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा गांधी यांनी आपल्या लेखनातून लेखक, साहित्यिक, यांनी दिलेल्या संदेशाचा दाखला दिला. ते म्हणाले, गांधींजी म्हणत… “शब्द हे सामर्थ्य देतात. तसेच ते संयमही सांगतात.आपला अहंकार कठोर शब्द वापरावे सांगत असेल तरी अंतःकरणाने परवानगी देऊ नये. भावना उद्दीपित करणाऱ्या शब्दांचा वापर होऊ नये ”

साहित्य कसे जन्माला येते याबाबत गांधीजींनी विचार मांडले आहेत. त्यानुसार मुल्यातून विचार.. विचारातून शब्द .. शब्दातून कृती ..आणि कृतीतून व्यक्तिमत्त्वाची अभिव्यक्ती घडत असते…आणि त्यातून पुन्हा नवीन मूल्ये जन्माला येतात. ती मूल्ये आपले प्राक्तन लिहीत असता. स्थित्यंतरातून नवीन मूल्य जन्माला येतात. मात्र काही शाश्वत मूल्ये चिरंतन महत्वाची असतात. ती कायम जपली पाहिजेत.

त्यांनी या व्यासपीठावर मराठीमध्ये होणाऱ्या विविध साहित्य संमेलनांचा गौरव केला.मराठी भाषेत सर्वाधिक संमेलने होतात. ही परंपरा वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही सर्व संमेलने साहित्य आणि आपल्या अभिव्यक्तीला समृद्ध करत असतात. त्यामुळे संमेलनाची परंपरा मोलाची आहे.

विदर्भ साहित्य संघ आणि मराठी साहित्य परिषद या संस्थांचे साहित्य आणि मराठी संवर्धनात अभिमानास्पद कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.विदर्भ साहित्य संघाच्या वाटचाली बद्दल त्यांनी यावेळी विचार व्यक्त करताना अतिशय संघर्षमय स्थितीतून विदर्भ साहित्य संघाने आतापर्यंत वाटचाल केली असून 100 वर्षातील वाटचालीची विशेष नोंद घेतली असल्याचे सांगितले.शताब्दी वर्षानिमित्त विदर्भसाहित्य संघाला दहा कोटींचा निधी राज्य शासनातर्फे देणगी म्हणून देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

वर्धा येथील साहित्य संमेलन हे उणीवांवर बोट ठेवण्यापेक्षा जाणिवा समृद्ध करण्यात यशस्वी होईल, आपल्या सर्व अभिव्यक्तीना या ठिकाणी स्थान मिळेल,सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीला स्थान देऊनही ते समृद्ध होईल, अशा शुभेच्छाही त्यांनी शेवटी दिल्या.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगरातर्फे विद्यार्थी विभागाने आज ‘ब्रंच ओवर बजेट’ चे आयोजन!

Sun Feb 5 , 2023
 नागपुर :-भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगरातर्फे विद्यार्थी विभागाने आज ‘ब्रंच ओवर बजेट’ ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले. बजेट आल्यानंतर महाविद्यालयातील सामान्य विद्यार्थ्यांना बजेटबद्दल जिव्हाळा निर्माण व्हावा व बजेट समजावे या दृष्टीकोनाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या विद्यार्थी विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमामध्ये जवळपास १२ कॅालेजेसच्या प्रतिनीधीं बोलविण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी व भाजयुमो प्रदेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com