पणजी :-गतविजेत्या महाराष्ट्र महिला मल्लखांब संघाने आपले वर्चस्व अबाधित ठेवत शुक्रवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
महाराष्ट्र संघाने रोप आणि पोलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत सर्वाधिक ८५.१५ गुणांची कमाई केली. महिला संघाने रोपमध्ये ४२.५५ आणि पोलमध्ये ४२.६० गुण मिळवले. रुपाली गंगावणे, जान्हवी जाधव, नेहा क्षीरसागर, पल्लवी शिंदे, निधी राणे आणि सायली शिंदे यांचा या संघात समावेश आहे. या गटात मध्य प्रदेश संघ रौप्य आणि तामिळनाडू संघ कांस्यपदक विजेता ठरला.
प्रशिक्षक प्रणाली जगताप, स्वप्नील शिंदे आणि व्यवस्थापक संजय केकान यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने मल्लखांबमध्ये सुवर्णपदकाचे खाते उघडले आहे.
नाशिकमध्ये कसून सराव; स्पर्धेत आठ सुवर्णपदकाचा दावा: जगताप
महाराष्ट्र संघाने नाशिक येथे मल्लखांबसाठी कसून सराव केला आहे. यादरम्यान तंत्रशुद्ध प्रशिक्षणामुळे खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा निश्चितपणे उंचावला. यामुळे महाराष्ट्र महिला संघाला सुवर्णपदकाचे खाते उघडता आले. संघातील खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. सोनेरी यशाच्या दर्जेदार कामगिरीमध्ये सातत्य ठेवत महाराष्ट्र संघ मल्लखांब मध्ये यंदा आठ सुवर्णपदकांचा दावेदार आहे. त्यामुळे संघाला निश्चितपणे आपले वर्चस्व अबाधित ठेवता येईल असा विश्वास प्रशिक्षक प्रणाली जगताप यांनी व्यक्त केला आहे. खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे मोठे यश संपादन झाले, अशा शब्दांत त्यांनी खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला.
महाराष्ट्राच्या खेळाडूमध्ये प्रचंड गुणवत्ता : केकाण
तळागाळातील युवा खेळाडू मल्लखांब मध्ये सध्या आपला ठसा उमटवत आहेत. प्रचंड मेहनतीच्या बाळा या खेळाडूने आपली गुणवत्ता सिद्ध करत महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोल आहे. खेळाडू प्रचंड मेहनती असल्यामुळे त्यांना यशाचा पल्ला गाठता येत आहे. यामुळे महाराष्ट्राला जागतिक स्तरावर निश्चितपणे नाव लौकिकास साजेशी कामगिरी करण्याची मोठी संधी आहे. महिला संघाने सर्वोत्तम कामगिरी करत पहिले सुवर्णपदक महाराष्ट्राला मिळवून दिले आहे, असे व्यवस्थापक संजय केकान सांगितले.