नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत द्या, पोकळ घोषणा नको – नाना पटोले

– अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत अद्याप मिळाली नाही.

– सरकारवर शेतकरी, गरिब जनतेचा विश्वासच राहिला नाही.

– वारकरी लाठीहल्ला प्रकरणी विरोधकांची विधानभवनच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी.

मुंबई :- राज्यातील शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले आहे पण राज्य सरकारची मदत काही पोहचत नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करते त्याची अंमलबजावणी होत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळालेली नाही, त्याचा सर्वेही केलेला नाही. सरकारकडे तलाठी, कृषी सहाय्यक ही यंत्रणा नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारने तातडीने सरसकट मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

अधिवेशनातील चर्चेत भाग घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पावसामुळे लाखो होक्टर शेती पाण्याखाली गेली आहे तर लोकांच्या घरात पाणी शिरले आहे, अन्नधान्य वाया गेला आहे, लोक उपाशी आहेत. शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या डोळ्यातले अश्रु थांबत नाहीत. कृषीप्रधान राज्यात शेतकरी व गरिबांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. हा विषय राजकारण करण्याचा नाही, ज्यांचे- ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारकडून भरीव मदत दिली पाहिजे. सरकार कोट्यवधी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मंजूर करुन घेते मग शेतकऱ्यांना मदत का होत नाही. शेतकऱ्यांचा, सर्व सामान्य जनतेचा या सरकारवर विश्वासच राहिलेला नाही, हा विश्वास पुन्हा मिळवण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत असे मंत्री सांगतात पण प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. एक रुपयात वीमा अशी सरकारने घोषणा केली आहे, त्याबाबतचे निवेदनही होणे गरजेचे आहे. मदतीसंदर्भात सरकारची भूमिका सुस्पष्ट असायला हवी अशी कांग्रेसची भूमिका आहे.

मणिपूरमधील परिस्थितीस मोदी सरकार व मणिपूरमधील भाजपा सरकारच जबाबदार !

विधानभवन परिसरात मणिपूरमधील परिस्थितीवर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून या परिस्थितीला मणिपूरचे भाजपा सरकार व केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे. मणिपूरमधील भाजपा आमदारानेच मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. सरकारच एका जातीवर अत्याचार करण्यास प्रोत्साहन देत आहे आणि कारवाई मात्र केली जात नाही. महिलेला विवस्त्र करून तिची धिंड काढून तीच्यावर अत्याचार करण्यात आल्याच्या आणखी चार घटना घडल्याचे या स्थानिक आमदारानेच जाहीरपणे सांगितले आहे. या घटनांची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली पण त्यासंदर्भात कारवाई काही झाली नाही असा गंभीर आरोप त्या आमदाराने केला आहे.

मणिपूरमधील ज्या महिलेवर अत्याचार करण्यात आला तीचा पती कारगिल युद्धाचा हिरो आहे. देशाला वाचवण्यासाठी जिवाची पर्वा न करता त्याने विजय मिळवला, भारतमातेला त्याने वाचवले पण स्वतःच्या पत्नीची इज्जत मात्र तो वाचवू शकला नाही. मणिपूर जळत आहे पण मोदी सरकार व भाजपाला त्याचे काही देणेघेणे नाही. देशात व राज्यात लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम भाजपा करत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

आषाढी वारीच्यावेळी आळंदीत झालेल्या वारकऱ्यांवरील लाठीहल्ला प्रकरणी अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्याआधी विरोधीपक्षांनी विधान भवनच्या पायऱ्यावर आंदोलन केले. वारकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात अंधाराचे संकट

Mon Jul 24 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले असून चोरट्यानी आता विद्दूत डी पी च्या ऑईल चोरीकडे आपला मोर्चा वळविला आहे ज्यामुळे ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असून बहुधा गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.एकदा गेलेला वीज पुरवठा आठ आठ दिवस सुरळीत होत नाही त्यामुळे ग्रामवासीयांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ऑइल चोरीमुळे गावात विज पुरवठा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com