– शिक्षक परिषदेतर्फे शिक्षक, विद्यार्थ्यांचा सत्कार
नागपूर :- शिक्षणाची आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. अशा परिस्थितीत आता ज्ञानाचे युग असल्यामुळे नवीन पिढीला रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) शिक्षकांना तसेच शिक्षण संस्थांना केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने गांधीसागर येथे शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच दहावी व बारावीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी ना. नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी आमदार नागो गाणार, परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र पटले, व्हीएनआयटीच्या समुपदेशक सुमित्रा चटर्जी, पुजा चौधरी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘आपल्या हातून घडलेला विद्यार्थी समाजाच्या देशाच्या सेवेसाठी तयार असेल, असे प्रयत्न करा. समाजात एक चांगले स्थान विद्यार्थ्याने प्राप्त केले पाहिजे. तो एक सुसंस्कारित नागरिक म्हणून ओळखला गेला पाहिजे. कारण त्यावरच त्याच्या व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन होणार आहे.’ विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण संस्था या चौघांमध्येही गुणात्मक बदल होण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनो, संतांचा आदर्श ठेवा
पदवी प्राप्त करणे, जीवनात यशस्वी होणे हेच अंतिम उद्दिष्ट ठेवू नका. आपल्या कर्तृत्वातून देशाचे नाव उंचावण्याचे स्वप्न उराशी बाळगा, असे आवाहन ना. गडकरी यांनी विद्यार्थ्यांना केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराजांकडे पदवी नव्हती. पण आज पदवी देणाऱ्या विद्यापीठांना त्यांची नावे आहेत, असाही उल्लेख त्यांनी आवर्जून केला.