नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सुधारित वाहन भत्ता, सातवा वेतन आयोगाची थकबाकी, दिवाळीमध्ये बोनस, महागाई भत्त्याची थकबाकी हे सर्व विनाविलंब देण्याची मागणी नागपूर जिल्हा महानगरपालिका संघटनेचे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना केली आहे.
नागपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात नागपूर जिल्हा महानगरपालिका संघटनेद्वारे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाची प्रत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी व आमदार प्रवीण दटके यांना देखील देण्यात आली आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या नागपूर जिल्हा महानगरपालिका संघटनेला प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने संघटनेद्वारे आयुक्तांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत विविध विभाग तसेच संवर्गातील कर्मचाऱ्यांना तात्काळ सुधारित वाहन भत्ता लागू करण्यात यावा, मनपामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या अपघात मृत्यू प्रकरणी अधिक लाभ व्हावा यादृष्टीने कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन हे मागणीनुरूप राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याकरिता योग्य त्या प्रक्रियेची अंमलबजावणी करावी, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा मनपा कर्मचाऱ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा, येत्या दिवाळी सणानिमित्त मनपातील कार्यरत कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात यावी, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना प्रलंबीत महागाई भत्त्याकरिता थकबाकी देण्याबाबात वारंवार पत्रव्यवहार मागणी करण्याची वेळ येउ नये यासाठी मनपा कर्मचाऱ्यांना विना विलंब महागाई भत्ता मिळण्याकरिता योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, महाराष्ट्र शासनाप्रमाणे मनपामधील कर्मचाऱ्यांकरिता विभागीय परीक्षा पध्दतीचा अवलंब पूर्णवत सुरू करावा जेणे करून आकृतीबंधामधील रिक्त असलेल्या जागेवर कर्मचाऱ्यांना पात्रतेनुसार विभागीय परीक्षा घेतल्यास कर्मचाऱ्यांना कामाचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार नाही, कर्मचाऱ्यांना व त्यांच्या परिवाराला आरोग्य सेवा मिळण्याकरीता स्वत: जवळील राशी खर्च करण्याची वेळ येणार नाही व पैशाअभावी सामान्य गरीब नोकरदार वर्गांवर आरोग्य सेवा घेण्यात अडचणी येउ नयेत यासाठी मनपा मधील विविध संवर्ग/विभागातील कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय देयकाबाबत निर्णय प्रक्रिया विनाविलंब राबवून त्यांचे वैद्यकीय बिल एक महिन्याचे आत देण्यात यावे, तसेच कर्मव्याकरीता महाराष्ट्र शासनाप्रमाणे कॅशलेस आरोग्य विभाग विमा प्रकिया राबविण्यात यावी, आदी मागण्या नागपूर जिल्हा महानगरपालिका संघटनेचे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मनपा आयुक्तांना केलेल्या आहेत.
सदर न्यायोचित मागण्यांकरीता योग्य ते निर्देश देउन कर्मचाऱ्यांचे सर्वांगिण हित जोपासण्याची विनंती देखील ॲड. मेश्राम यांनी आयुक्तांना केली आहे.