मुंबई :- जायकवाडी प्रकल्प अंतर्गत नेवासा तालुक्यातील प्रकल्प बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरविण्याकरिता 46 कोटी 10 लाख 37 हजार 142 निधी उपलब्ध करून दिला असून उर्वरित नागरी सुविधांची अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेकरिता विभागीय आयुक्त नाशिक कार्यालयामार्फत सादर करण्यात आली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
याबाबत सदस्य विठ्ठल लंघे यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली. यावेळी मोनिका राजळे यांनी सहभाग घेतला.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले, सन १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पात बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरविण्याकरिता नुकतीच मंत्री मंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसन झालेल्या गावठाणांमध्ये अपूर्ण नागरी सुविधा पुरवण्यासाठी कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.