नागपूर दि.17 : दिव्यांग प्रमाणपत्र व दिव्यांगांसाठी आवश्यक असणारे वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असणारी तपासणी मोहीम जिल्ह्यात सोमवार पासून सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्या गावातील प्रत्येक दिव्यांगाकडे आधी असले तरी नवीन ओळख पत्र व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आपापल्या परिसरात तारखेनुसार लागणाऱ्या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी आर विमला, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
नागपूर जिल्ह्यामध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली असून यासाठी आवश्यक असणारा निधी जिल्हा परिषदेने उभारला आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून त्यातून ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आपल्या परिसरात होणाऱ्या तपासणी शिबिरापूर्वी दिव्यांग प्रमाणपत्र करिता नागरी सुविधा केंद्रातील कॉमन सर्विस सेंटर मध्ये किंवा नजीकच्या सेतू सुविधा केंद्रांमध्ये जाऊन स्वावलंबन कार्ड या पोर्टल वर प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच यासंदर्भात अधिक माहितीसाठी बौद्धिक दिव्यांगत्व बहू दिव्यांगत्व प्रवर्गातील व्यक्तींनी ७७५५९२३२११, कर्णबधिर प्रवर्गातील व्यक्तींनी ७३८७७०९५०७७, अस्थिव्यंग प्रवर्गातील व्यक्तींनी ७७५६८५५०७७, तर अंध प्रवर्गातील व्यक्तींनी ७३८५७५३२११ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारपासून जिल्ह्यामध्ये नागपूर ग्रामीण तालुक्या करिता इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नागपूर येथे सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्याच्या ठिकाणची तपासणी पुढीलप्रमाणे आहे. २२ डिसेंबर उमरेड तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र बेला, २४ डिसेंबर ग्रामीण रुग्णालय उमरेड, 27 डिसेंबर ग्रामीण रुग्णालय भिवापूर, 29 डिसेंबर ग्रामीण रुग्णालय कुही, 31 डिसेंबर ग्रामीण रुग्णालय नरखेड, 3 जानेवारी ग्रामीण रुग्णालय हिंगणा, 5 जानेवारी ग्रामीण रुग्णालय कामठी, 7 जानेवारी ग्रामीण रुग्णालय काटोल, 10 जानेवारी ग्रामीण रुग्णालय सावनेर, 12 जानेवारी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर, 14 जानेवारी कुटीर रुग्णालय देवलापार, 15 जानेवारी ग्रामीण रुग्णालय रामटेक, 17 जानेवारी ग्रामीण रुग्णालय मौदा, 19 जानेवारी ग्रामीण रुग्णालय पारशिवनी या नुसार तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टर ही तपासणी करणार आहे. त्यामुळे या तपासणी शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी केले आहे.
-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com