नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सवातील हँडबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघांना नमवून फ्रेन्ड्स क्लब आणि युनिक गर्ल्स संघाने पुरूष व महिला गटात अजिंक्यपद पटकाविले. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे शनिवारी (ता.20) रात्री स्पर्धेची अंतिम लढत झाली.
पुरूष खुल्या गटात फ्रेन्ड्स क्लबने क्रीडा प्रबोधिनी संघाला 20-15 अशी मात देत विजेतेपद जिंकले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात कोंढाळीच्या अजिंक्य क्लबने विजय मिळविला. महिला खुल्या गटातील अंतिम लढत युनिक गर्ल्स विरुद्ध फ्रेन्ड्स क्लब यांच्यात झाली. अटीतटीच्या सामन्यात युनिक गर्ल्स संघाने 16-12 ने फ्रेन्ड्सचा पराभव करीत विजेतेपदाचे चषक उंचावले. महिलांतील तिसऱ्या स्थानाच्या सामन्यातही अजिंक्य क्लबने बाजी मारली.
17 वर्षाखालील वयोगटातील मुलांच्या अंतिम लढतील लखोटीया हायस्कूल संघाने लखोटीया सीबीएसई संघाचा 25-22 ने पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. तर मुलींमध्ये केंद्रीय विद्यालय संघाने लखोटीया कोंढाळी संघाचा 10-7ने पराभव करून अजिंक्यपद पटकाविले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात मुलांमध्ये केंद्रीय विद्यालय व मुलींमध्ये संस्कार विद्या सागर संघ विजयी झाला.