– नव्या आयुक्तांना नवे आव्हान
नागपूर :- दारु पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे एकाचा मित्रानेच चाकूने भोसकून खून केला. आरोपी शहरातून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कपीलनगरात घडली. मंगेश गणेश मेंढे (४५, उन्नती कॉलनी, समतानगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दत्तू ऊर्फ राहुल रमेश रामटेके (१९,मानवनगर, टेकानाका) असे आरोपीचे नाव आहे. नवे पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंघल रुजू होताच दर दिवसाला हत्याकांडाच्या घटना घडत आहेत,त्यामुळे नव्या पोलीस आयुक्तांसमोर नवे आव्हान उभे आहे.
मंगेश मेंढे हे वाळूचा व्यवसाय करतात. पत्नी व दोन मुलांसह उन्नती कॉलनीत राहतात. ते वस्तीत वाळू व्यवसायानिमित्त फिरत असतात. त्यांची आरोपी राहुलशी मैत्री होती. तो अनेकदा त्यांच्याकडे कामालाही जात होता.
शुक्रवारी रात्री अकरा वाजता टेकानाका जवळून मंगेश हे जात होते. तेथे त्यांना राहुल भेटला. त्याने मंगेश यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले.मात्र, मंगेश यांनी दारूसाठी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या राहुलने पाठीमागे लपविलेला चाकू काढून थेट मंगेश यांच्या छातीत भोसकला आणि पळून गेला. रस्त्यावरील नागरिकांना मंगेश यांना रुग्णालयात पोहचवले.मात्र, उपचारापूर्वीच मंगेश यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कपीलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी राहुल रामटेके याला अटक केली.