दिव्यांगांची वारी प्रथमच विठ्ठलाच्या दारी

– दृष्टीहिनांची वारी यवतमाळातून पंढरपूरला जाणार

– दिव्यांग संघ व सेवा समर्पण प्रतिष्ठानचा उपक्रम

यवतमाळ :- पावसाळा सुरू झाला की, महाराष्ट्राला पंढरपूरच्या वारीचे वेध लागतात. विठ्ठलाच्या ओढीने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी हरी नामाचा गजर करत पंढरपूरात चंद्रभागेच्या वाळवंटात दाखल होतात. अबाल, वृद्ध दिंडी घेवून पायदळ वारी काढतात. अशीच अनोखी वारी यावर्षी आषाढीनिमित्त यवतमाळातून पंढरपूरला जाणार आहे. या वारीत धडधाकट माणसं सहभागी होणार नसून, दिव्यांग दृष्टीहीन व्यक्ती सहभागी होत आहे. पूर्णत: दिव्यांगांची पंढरपूरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे.

यवतमाळ येथील सेवा समर्पण प्रतिष्ठान आणि दिव्यांग संघ यांनी हा अभिनव प्रयोग केला आहे. शहरालगत भोसा शिवारात सेवा समर्पण प्रतिष्ठानद्वारे पाच एकर परिसरात विविध सामाजिक संस्थांसाठी ‘सोशल क्लस्टर’ निर्माण केले आहे. याच ठिकाणी दिव्यांग संघाला जागा देण्यात आली. या संघाचे अध्यक्ष प्रवीण कठाळे यांच्या मार्गदर्शनात संचालक सदानंद तायडे हे येथे १० ते १५ दृष्टीहिनांचा सांभाळ करतात. हे सर्व दृष्टीहीन विदर्भातील विविध जिल्ह्यांतील आहेत. ते ‘सूरचक्षु’ हा दृष्टीहिनांचा आकेस्ट्रा चालवितात. या कार्यक्रमाच्या मिळकतीतून या सर्वांचा खर्च भागविला जातो. सेवासमपर्ण प्रतिष्ठानने दिव्यांग संघाला जागा आणि राहायला खोल्या बांधून दिल्या आहेत. लागेल तशी मदत सेवा समर्पणचे अध्यक्ष प्रशांत बनगिनवार, सचिव अनंत कौलगीकर, सदस्य सुरेश राठी, डॉ. अलोक गुप्ता, दीपक बागडी हे करतात.

या दृष्टीहिनांना पंढरपूरच्या वारीत घेवून जायची कल्पना सदानंद तायडे यांच्या डोक्यात आली. सेवा समर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बनगिनवार व सचिव अनंत कौलगीकर यांनी या दृष्टीहिन बांधवांची वारीच पंढरपूरला घेवून जायचा निश्चय केला आणि सर्व तयारी सुरू केली. येत्या मंगळवारी २५ जूनला सकाळी साडेआठ वाजता स्थानिक ओम सोसायटीतील अष्टविनायक गणपती मंदिरातून संत सूरदास यांची प्रतिमा व पादूका घेवून ही वारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. आर्णी, दिग्रस, पुसद, कळमनुरी, परभणी, परळी, अंबेजागाई, कुर्डूवाडी, पंढरपूर असा २२ दिवस ५२१ किमीचा पायदळ प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर येथे पोहचणार आहे. दररोज किमान २० ते २५ किमीचा प्रवास करणार असून, मार्गात भजन, कीर्तन असे कार्यक्रमही हे बांधव घेणार आहे. या वारीत दिव्यांग संघाचे अध्यक्ष प्रवीण कठाळे, सेवा समर्पणचे अध्यक्ष प्रशांत बनगिनवार, दिंडीचे संयोजक दिव्यांग संघाचे संचालक सदानंद तायडे, गजानन मानकर, प्राची बनगिनवार, सोमनाथ अफुणे, बालाजी तपासकर, हनुमान डहाणे, विशाल चक्रे, गुड्डू अंबुडारे, माधव निंबलवार, प्रज्वल तुमसरे, यश गायकवाड, दुर्गा तुंबलवार, रीमा तोडकर, प्रणाली उईके, प्रमोद जगनाळे, फकीरा भालेराव, मनकर्णा यशवंत, संकेत गायकवाड आदी सहभागी होणार आहेत.

दिव्यांगांची पहिलीच स्वतंत्र दिंडी

शेकडो वर्षांपासून पंढरपूर येथे राज्यभरातून वारकरी दिंडी घेवून दाखल होतात. असंख्य दिव्यांग लोकही विविध वारीतून पंढरपूरला जातात. मात्र फक्त दिव्यांगांची स्वतंत्र वारी निघण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिव्यांगांची पहिलीच स्वंत्रत दिंडी घेवून दृष्टीहिन वारकरी पंढरपूर येथे पोहोचणार असून हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण राहणार आहे. ही प्रथा यवतमाळातून सुरू होत असल्याचा आनंद आहे, असे दिव्यांग संघाचे संचालक सदानंद तायडे व सेवा समर्पणचे अध्यक्ष प्रशांत बनगिनवार यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी योग अत्यावश्यक - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Sat Jun 22 , 2024
– महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमात – हजारो योग साधकांची उपस्थिती नागपूर :- मानवी जीवनात योगासनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिक सुदृढ आरोग्यासाठी नियमितपणे योगसाधना करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हजारों नागरिकांनी सामूहिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com