नागरिकांचे प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा : मनपा आयुक्त
नागपूर :- नागरिकांच्या तक्रारींची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी, शासनातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. हा पंधरवडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ स्वरुपात साजरा करण्यात येत आहे. यात विविध क्षेत्रातील सेवा विषयांचा समावेश आहे. या प्रलंबित तक्रारींबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येणार आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी शुक्रवारी सेवा पंधरवाडाचा आढावा घेतला आणि अधिका-यांना लवकरात-लवकर प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश दिले. तसेच झोन स्तरावर सेवा संदर्भातील प्रमाणपत्र वाटपासाठी शिबीर आयोजित करावे, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयादरम्यान, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान, नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आपले सरकार, नागरी सेवा केंद्र व इतर वेबपोर्टलवरील प्रलंबित अर्जांचा जलदगतीने निपटारा होईल.
बैठकीत अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, अति.आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, रविन्द्र भेलावे, उपायुक्त (घनकचरा) डॉ. गजेन्द्र महल्ले, उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त तथा संचालक (माहिती व तंत्रज्ञान) महेश धामेचा, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता डॉ.श्वेता बॅनर्जी यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी आणि झोनचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
नागरिकांना पुरविण्यात येणा-या सेवामध्ये अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, कर विभाग, नगररचना विभाग, जलप्रदाय विभाग अंतर्गत येणा-या सेवांमध्ये जन्म प्रमाणपत्र देणे, मृत्यू प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, नव्याने कर आकारणी, नव्याने कर आकारणी (नामांतारणासह), कराची मागणी पत्र तयार करणे, बांधकाम परवाना देणे (निर्णय घेणे), नवीन नळ जोडणी देणे, अग्निशमन ना हरकत दाखला देणे, अग्निशमन अंतिम ना-हरकत दाखला देणे यासारख्या महत्वाचा सेवांचा समावेश आहे.
दैनंदिन कामकाजासोबतच नागरिकांच्या समस्या ऐकुन घेऊन त्या सोडविण्यासाठी क्षेत्रीय अधिका-यांनी प्राधान्य दयावे, असेही निर्देश याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले.