संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूरचे उपनगर मानले जाणारे कामठी शहराची वाढती लोकसंख्या आणि गल्लीबोळात सुरू झालेल्या व्यवसायासह कामठी नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितांमुळे शहरात फुटपाथवर अतिक्रमण झाले असल्याने कामठी शहरातील प्रमुख चौकासह बाजारपेठ परिसरातील फुटपाथ बेपत्ता झाले आहेत. यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.यातून अपघाताची भितीही वाढली आहे.
नुकतेच जयस्तंभ चौक ते गांधी चौक व गोयल टॉकीज चौक ते पोलीस स्टेशन चौक पर्यंत असलेल्या दुभाजक वर अतिक्रमित करून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना कायद्याचा धाक दाखवून दुभाजक हे अतिक्रमणमुक्त करण्यात आले मात्र फुटपाथ वर अतिक्रमित करणाऱ्या व्यवसायिकावर कारवाही केव्हा होणार ?असा सवाल येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
कामठी शहरात बाजारातील गल्लीबोळात अनेकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. बेरोजगारीमुळे अनेकजण चरितार्थासाठी टपरी टाकून व्यवसाय करीत आहेत. शहराच्या बस स्टँड चौक, हैदरी चौक, फेरूमल चौक, गांधी चौक, जयस्तंभ चौक, बोरकर चौक, सोनार ओली,दाल ओली, सत्तू हलवाई चौक यासह शहराच्या विविध भागात लघु व्यवसायीकांनी फुटपाथवर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ही मंडळी याठिकाणी आपला व्यवसाय करीत असतात. मात्र यात शहरातील फुटपाथ गायब झाले आहे. नागरिकांना रहदारीच्या रस्त्यावरून चालावे लागते.त्यामुळे कायम अपघाताची भिती असते. तसेच खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना आपली वाहने भर रस्त्यावरच उभी करावी लागतात. त्यामुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण होतो. वाहतूक पोलीस या व्यवसायीकांना कधीही सूचना देऊन दुकानासमोरील वाहने हटविण्याचा प्रयत्न करताना दिसून आले नाही. बऱ्याच वर्षापासून ही परिस्थिती शहरात कायम आहे.शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे आधीच शहरवासीय जीव मुठीत घेऊन वाहने चालवितात. अहोरात्र या मार्गावरून भरधाव वाहतूक सुरू असते. त्यातच आता या महामार्गावरील तसेच शहरातील नियोजित ठिकाणी प्रलंबित असलेल्या पार्किंग झोन व नो पार्किंग झोन मुळे नागरिकाना डोकेदुखी करावी लागत आहेत. अनेक व्यववसायीकांनी फूटपाथवरच आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे याठिकाणी एकादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्थानिक प्रशासनाने शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याचा कधीही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. परंतु त्यात यश आले नाही. आता नुकतेच दुभाजक मुक्त अतिक्रमण काढल्याने शहरातील रस्त्यानी मोकळा श्वास घेतला आहे . परंतु फेरीवाल्याचा बेरोजगारीसह व्यवसायाचा प्रश्न पुढे आला. अनेकांचे व्यवसाय उध्वस्त झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.तेव्हा या अतिक्रमणधारक व्यवसायीकांना पर्यायी जागा देण्यात यावे . परंतु यावर कोणीही विचार करीत नाही. आज शहरातील सर्व फुटपाथ दुकानांनी गजबजले आहे.दुकानातील साहित्य रस्त्यावरशहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध ठिकाणचे दुकानदार आपल्या दुकानातील साहित्य रस्त्यावर मांडत असल्याने दिसून येते. . तर विविध व्यवसायीक दुकानाच्यापुढे साहित्य मांडतात. यामुळे वाहतुकीला अडथळा होवून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. नगरपरिषदेसह बांधकाम विभागाने याप्रकरणी लक्ष देवून अशा व्यवसायीकांना समज देण्याची गरज आहे.