– प्रचंड तापमानात कसे बसणार प्रवासी
नागपूर :-मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या जनआहारमध्ये पाय ठेवताच गरम वाफ,उष्णतेचा भडका उडाल्यासारखे वाटते. एक मिनीटेही बसता येणार नाही असे आतमधील वातावरण आहे. वारा येण्यास जागा नाही. त्यामुळे कुलर, पंखे असूनही काम करीत नाही. अशा स्थितीत तेथील कामगार आणि भोजनासाठी येणार्या प्रवाशांचे काय?
सध्या तापमानाचा पारा 43 अंशावर आहे. त्यातही प्रचंड उकाळा. जनरल कोचमधील प्रवाशांचा तर विचार न केलेलाच बरा. सुर्याची आग आणि छताची उष्णता त्यात भर घालते. घामाचे लोट निघत असताना जनरल डब्यात खचाखच प्रवासी असतात. प्रवाशांना उष्णतेपासून काही वेळ दिलासा मिळावा याहेतून मध्य रेल्वे प्रशासनाने मिस्ड कुलिंग यंत्रणेची व्यवस्था प्लॅटफार्म क्रमांक एकवर केली. ही यंत्रणा साधारण मे महिण्याच्या मध्यंतरी सुरू होते. पाईपमधून निघणारे थंड पाण्याचे फव्वारे अंगावर पडताच प्रवाशांना दिलासा मिळतो. मात्र, अजूनही ती यंत्रणा सुरू करण्यात आली नाही.
जनरल आणि स्लीपर डब्यातून प्रवास करणार्यांना मिस्ड कुलिंगचा आनंद मिळतो. प्लॅटफार्म एकवर प्रवाशांची वर्दळ असते. याच ठिकाणी जनआहार आहे. येथे माफक दरात खाद्य पदार्थ आणि भोजन मिळतो. उन्हाचे चटके सोसत आलेले प्रवासी काही वेळ येथे बसतात. नास्ता करतात, कोणी भोजन करतात. मात्र, याठिकाणी एक मिनीटही थांबत येत नाही, असे आतील वातावरण आहे. बसताच क्षणी गरम वाफा, उष्णतेचा भडका उडाल्यासारखे वाटते. प्रवासी कसे बसतील? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. किमान एसीची व्यवस्था असावी, असे प्रवासी सांगतात. जनआहारमध्ये कुलर, पंखे आहेत. मात्र, कुठलीच यंत्रणा काम करीत नसल्याचे कर्मचार्यांनी सांगितले. प्रवाशांच्या हितासाठी तत्पर असलेल्या रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.