Ø दिनांक 7 ते 11 मार्च दरम्यान आयोजन
Ø गायक कैलास खेर, नंदेश उमप यांचे गायन
Ø महोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानी
Ø कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत कवी संमेलन
यवतमाळ :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यवतमाळ येथे ‘महासंस्कृती महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि.7 ते 11 मार्च दरम्यान समता मैदानात होणार आहे. सुप्रसिद्ध गायक कैलास खेर, नंदेश उमप यांच्या गीत गायनासह विविध कार्यक्रमांचे सादरीकरण महोत्सवात होईल. महोत्सव तयारीचा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी आज महसूल भवन येथे आढावा घेतला.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, कार्यकारी अभियंता दादासाहेब मुकडे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महोत्सवात पहिल्या दिवशी दि.7 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता समई नृत्य व मंगळागौर तसेच सायंकाळी 7 वा ‘सुर नवा ध्यास नवा’ व सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम होईल. दि.8 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता ढेमसा नृत्य, बंजारा लोकसंस्कृतींचा समावेश असलेला कार्यक्रम होईल. सायंकाळी 7 वाजता दंडार नृत्य तसेच मराठी सिने अभिनेत्री माधवी निमकर, मयुरा परांडे यांचा समावेश असलेला ‘नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा’ हा कार्यक्रम होईल.
दि.9 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता ‘महाराष्ट्र लोककला दर्शन’ हा कार्यक्रम होईल. सायंकाळी 7 वाजता लेंगी नृत्य तसेच सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांचे गायन सादरीकरण कार्यक्रम होईल. दि.10 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता ‘मातीतून फुलले गाणे’ हा मराठी गझलेचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनशौर्यावर आधारीत पोवाडे सादरीकरण तसेच सुप्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत नामवंत कवींचे कविसंमेलन होणार आहे.
शेवटच्या दिवशी दि.11 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 10 वाजतादरम्यान स्थानिक कलावंतांद्वारे लावणी, गोंधळ, कलापथक, कव्वाली, बंजारा लोकनृत्य, नकला व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे.
यासह महोत्सवात प्रदर्शनिय दालने उभारण्यात येणार आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारित सचित्र दालन, हस्तकला वस्तु दालन, बचत गटांचे उत्पादन दालन, योजनांची माहिती देणारे दालन उभारण्यात येणार आहे. या महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणाऱ्या स्पर्धा, मर्दानी खेळ, शिवकालीन लोककला, लुप्त होत चाललेले खेळ रंगमंचावर दाखविण्यात येणार आहे.
या महोत्सवातील कार्यक्रम नियोजनबद्ध करण्यासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समितीला नेमून देण्यात आलेली कामे सुरळीत पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी यावेळी बैठकीत दिले.