– ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क आणि झिरो माईल बाबत चर्चा
नागपूर :- मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नव्याने स्थापन करण्यात आलेल्या हेरिटेज संवर्धन समितीची पहिली बैठक हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त आयएएस अधिकारी अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता: 27) पार पडली.
नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या आयुक्त सभाकक्षात पार पडलेल्या नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त आयएएस अधिकारी अनुप कुमार आभासी पद्धतीने सहभागी झाले. बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, हेरिटेज संवर्धन समितीच्या सदस्य सचिव लिना उपाध्ये, मनपाचे सहायक विधी अधिकारी सुरज पारोचे, व्हीएनआयटीचे प्रा. आर. के. इंगळे, हेरिटेज संवर्धनतज्ज्ञ डॉ. लिना रामकृष्णन, डॉ. शुभा जोहरी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अरुण मलिक, इंटॅक्टच्या मधुरा राठोड, विजय शेंडे, नगर रचना विभागाचे उपसंचालक ऋतूराज जाधव, राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत देशाचे केंद्रबिंदू असणाऱ्या नागपूरच्या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क आणि ‘झिरो माईल’ चे सौंदर्य यासंदर्भात मा. उच्च न्यायालयाने प्रलंबित जनहीत याचिकांमध्ये पारीत विविध आदेशांच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कस्तुरचंद पार्क व झीरो माईल चे सौंदर्यीकरण व संवर्धनसंबंधी कामांचे निरीक्षण करण्याकरीता नविन टास्क फोर्स चे गठन करण्यात आले. याशिवाय नागपूर शहरातील ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनाकरिता नियमावली तातडीने तयार करण्याबाबत समितीचे अध्यक्ष अनुप कुमार यांनी निर्देश दिले.