Ø राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीत आरमोरी सरस
Ø वर्धा जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींची दमदार कामगिरी
नागपूर :- “अमृत महाआवास अभियान २०२२-२३” अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या तालुक्यांची निवड विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने नुकतीच केली. केंद्र पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीत सर्वोत्तम कामगिरी करत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याने नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुका प्रथम स्थानी राहिला आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव प्रथम, गोंदिया तालुका द्वितीय तर नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर आणि रामटेक तालुक्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
आवास योजनांच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची दमदार कामगिरी
“अमृत महाआवास अभियान २०२२-२३” अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या सहा ग्रामपंचायतींच्या निवडीत एकट्या वर्धा जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनांच्या अंमलबजावणीत पहिले दोन्ही क्रमांक वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पटकाविले आहेत. कारंजा (घा.) तालुक्यातील काजळी प्रथम स्थानावर तर आष्टी तालुक्यातील आनंदवाडी दुसऱ्या स्थानावर आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या मुल तालुक्यातील राजगड ग्रामपंचायतीने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीत पहिल्या तिन्ही क्रमांकावर वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मोहोर उमटविली आहे. हिंगणघाट तालुक्यातील दोंदुडा ग्रामपंचायत प्रथम, आष्टी तालुक्यातील देलवाडी द्वितीय तर कारंजा (घा.) तालुक्यातील बोरी ग्रामपंचायत तृतीय स्थानावर आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव मुक्त वसाहत योजना आदी ग्रामीण गृह निर्माण योजना राज्यभर राबविण्यात येतात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतींना २० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतीमान करण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी अमृत महाआवास अभियान २०२२-२३ अंतर्गत पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्कार योजनेंतर्गत नागपूर विभागातील जिल्हे, तालुके व ग्रामपंचायतींच्या कामगिरीवर आधारित प्रस्तावांचा अभ्यास करुन विभागीय आयुक्त बिदरी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या अंमलबजावणी व सनियंत्रण व मूल्यमापन समितीने केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य करणारे प्रत्येकी तीन जिल्हे,तालुके व ग्रामपंचायतींची निवड केली आहे.