– दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला देखील हेल्मेट आवश्यक,वाहतूक पोलिसांकडून शहरात ठिकठिकानी जनजागृती
नागपूर :- दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या वाहतूक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी याबाबतचा आदेश राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे चालकाबरोबरच आता दुचाकीवरील सहप्रवाशालाही हेल्मेट करावे लागणार आहे. या बाबत नागरिकांना किंवा वाहन चालकांना माहिती व्हावी यादृष्टीकोणातून शहर वाहतूक पोलिसांकडून जनजागृती केली जात आहे. काही दिवस जनजागृती केल्यानंतर कदाचित बुधवार ४ नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वाढते अपघात व मृत्युमुखी पडणार्यांची संख्या लक्षात घेऊन राज्याच्या वाहतूक विभागाच्या अपर पोलिस सहप्रवाशालाही हेल्मेट सक्तीचे आदेश काढले. तीन दिवसांपूर्वीच उपरोक्त आदेश राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्याअनुषंगाने शहर वाहतूक पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी नागरिकांना वेळ मिळावा. आदेशासंदर्भात परिपूर्ण माहिती व्हावी, या द्ष्टीकोणातून शहरात जनजागृती करीत आहेत. वाहतूक पोलिस चौकाचौकात जावून वाहनचालकांत नव्या आदेशासंदर्भात माहिती देत आहेत. पोलिस बुथच्या माध्यमातून उद्घोषणप्रणालीव्दारे नागरिकांना सांगत आहेत. तसेच पोलिस व्हॅन उद्घोषणप्रणालीव्दारे नव्या आदेशाची माहिती दिली जात आहे. वाहनचालकांसोबतच सहप्रवाशाला हेल्मेट आवश्यक आहे. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना चालक आणि सहप्रवासी या दोघांनीही हेल्मेट वापरावे, असे आवाहन वाहतूक पोलिस करीत आहेत.
शहरात जनजागृती
दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात अनेकांना माहिती नाही. संपूर्ण शहरात आधी जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्यक्षात कारवाईला सुरूवात करू तेव्हा आम्हाला माहितच नव्हते, असे कोणी म्हणायला नको. म्हणून आत्ता केवळ जनजागृतीवरच भर देण्यात येत आहे.