ज्येष्ठ नागरिकांना सर्वतोपरी न्याय देण्याचा प्रयत्न – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

· जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक व संस्थांचा सत्कार व गौरव

· ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 14567

ज्येष्ठांनी दिला जिल्हाधिकाऱ्यांना आशिर्वाद…

आज आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या गौरव सोहळ्यात जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी ज्येष्ठांनी त्यांना केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या….

नागपूर :-  ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक, आरोग्य, निवास व सुरक्षाविषयक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलात आणले आहे. ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी सामाजिक न्याय विभागात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी हे सर्वसमावेशक धोरण असून ग्रामपातळीवरही त्याच्या प्रभावी अंमलबजावणीतून ज्येष्ठांना सर्वतोपरी न्याय दिला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज येथे सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा सत्कार व गौरव जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती  नेमावती माटे, शिक्षण सभापती मालती पाटील, प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, उपायुक्त तथा जात पडताळणी समितीचे सदस्य सुरेंद्र पवार, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाजकल्याण अधिकारी किशोर भोयर, सामाजिक कार्यकर्ते हुकूमचंद मिश्रीकोटकर, होम फॉर ओल्डेजच्या सिस्टर आयरिन आदी यावेळी उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळामध्ये आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलात आणले आहे. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाव्दारे ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनांचा लाभ घेऊन आपले जीवन सुखकर करावे. शहरी व ग्रामीण भागातील ज्येष्ठ व्यक्तींच्या वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच ज्येष्ठांच्या मदतीसाठी शहरी भागासह ग्रामस्तरावर स्वंयसेवी संघटनांच्या मदतीने समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येईल, असे डॉ. इटनकर म्हणाले.

समाजाचे नागरिकीकरण व औद्योगिकीकरण झाल्याने संयुक्त कुटुंब या संकल्पनेचा ऱ्हास झालेला आहे. भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी आई-वडील, आजी-आजोबासारखे वयोवृध्द व्यक्ति हे एक चांगले माध्यम असून तरुण पिढीला नैतिक मूल्यांचे शिक्षण हे त्यांच्याकडून मिळत असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वयोवृध्द आई-वडीलांचा तसेच इतर ज्येष्ठांचा आदर सन्मान करावा. ज्येष्ठांनी दिलेल्या ज्ञानातून संस्कारक्षम पिढी घडत असल्याने त्यांना चांगली वागणूक द्यावी, असे आवाहन उपायुक्त  पवार यांनी यावेळी केले.

ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक, सामाजिक व कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांना आवश्यक सहाय्यता करण्यासाठी जेष्ठ नागरिक धोरण राज्य शासानाने अंमलात आणले आहे. वयोवृद्धांचे समस्यांची सोडवणूक करुन त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाव्दारे विविध योजना राबविण्यात येतात. ज्येष्ठांकडून मिळणारा ज्ञानाचा वारसा जपून ठेवण्यासाठी तसेच त्यांचाप्रती सन्मान व आदराची जाणीवजागृती करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक दिन जगात सर्वत्र साजरा करण्यात येतो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाव्दारे राबविण्यात आलेल्या सेवा पंढरवाड्यात सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिक व तृतीयपंथींसाठी विविध महत्वाची कागदपत्रे तयार करुन देण्यात आली. याठिकाणी जेष्ठांसाठी स्थापित करण्यात आलेल्या कक्षाच्या माध्यमातून विविध तक्रारींवर समुपदेशन व कार्यवाही केली जाते. विभागाव्दारे संबंधित जेष्ठ व्यक्तिला येणाऱ्या अडचणीचे निराकरण करुन त्यांचे समाधान केले जाते, असे प्रादेशिक उपायुक्त  गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती नेमावती माटे व शिक्षण सभापती मालती पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हुकूमचंद मिश्रीकोटकर यांनीही यावेळी समायोचित भाषण केले.

या गौरव सोहळ्यात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हुकूमचंद मिश्रीकोटकर, होम फॉर एजेड ॲन्ड हॅन्डीकॅप्डच्या सचिव सिस्टर आयरीन, फेसकॉमचे सचिव वसंतराव कळंबे, सिनीअर सिटीझन कॉन्सीलचे सुरेश रेवतकर, सेवानिवृत्त न्यायाधीश भावना ठक्कर, पंचवटी वृध्दाश्रम उमरेडच्या सचिव  विभा टिकेकर, मातोश्री वृध्दाश्रम आदासाचे संचालक भारती सराफ, स्वामी विवेकानंद वृध्दाश्रमाचे सचिव युगान्त कुंभलकर आदींचे मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी-कर्मचारी व विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, महिला मंडळी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com