– महामेट्रोच्या विनंतीला मनपाची हिरवी झेंडी
नागपूर :- महामेट्रोचे स्टेशन असलेल्या तीन मार्गांवर नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ची नवीन फिडर सेवा लवकरच सुरू होणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात व परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांच्या नेतृत्वात ही फिडर सेवा १८ मार्चपासून सुरू होत आहे.
महामेट्रोद्वारे विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या ‘मेट्रो संवाद’ कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, औद्योगिक कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी आदींद्वारे विविध मार्गांवर परिवहन सेवेची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार महामेट्रोद्वारे या मार्गांवर ‘आपली बस’ची फिडर सेवा देण्याबाबत मनपाला विनंती करण्यात आली. या विनंतीला मनपाच्या परिवहन विभागाद्वारे हिरवी झेंडी दाखविण्यात आली असून यामुळे प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड व नागपूर महानगरपालिका परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने काही दिवसांपूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मानव्यशास्त्र विभाग तसेच एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशनसोबत मेट्रो संवाद कार्यक्रम घेण्यात आला. सार्वजनिक वाहतुकीचा वापर जास्तीत जास्त वाढावा, हवेतील कार्बन प्रदूषण कमी व्हावे तसेच रस्ते अपघाताचे प्रमाण सुध्दा कमी व्हावे यादृष्टीने मेट्रो संवाद कार्यक्रमामधून जनजागृती केली जाते. या मेट्रो संवादमध्ये धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन ते विद्यापीठ परिसर अमरावती रोड अशी बस सेवा विद्यार्थी व शिक्षकांच्या सोयीसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच हिंगणा औद्योगिक क्षेत्रातील औद्योगिक प्रतिष्ठानांमार्फत औद्योगिक क्षेत्रातून मेट्रो स्टेशन पर्यंत व हिंगणा गावापर्यंत बस सेवा सुरू करण्याबाबत मागणी करण्यात आली होती. याशिवाय ऑटोमोटिव्ह चौक ते सक्करदरा या मार्गावर सुध्दा शहर बस सेवा सुरू करण्याची नागरिकांची मागणी होती.
त्याअनुषंगाने महामेट्रोतर्फे नागपूर महानगरपालिकेचे परिवहन विभागास उपरोक्त तिनही मार्गांवर नवीन फिडर सेवा सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे या तिनही मार्गांवर फिडर सेवा सोमवार १८ मार्च २०२४ पासून सुरू करण्यात येत आहे. या मार्गांवर फिडर सेवा सुरू झाल्यानंतर झाल्यानंतर ‘आपली बस’ व महामेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होईल, असा विश्वास परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी व्यक्त केला आहे.
नवीन फिडर बस सेवेचे मार्ग
· कामठी ते मेडिकल चौक (मार्गे – ऑटोमोटीव्ह मेट्रो स्टेशन व चितारओळी मेट्रो स्टेशन).
· राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसर अमरावती रोड ते रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन (मार्गे – धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन – सुभाष नगर मेट्रो स्टेशन – आय.टी. पार्क – व्ही.एन.आय.टी. – माटे चौक – लक्ष्मीनगर चौक).