– 3 गाईंची शिकार करणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त केव्हा होणार ?
– बिबट्याच्या दहशतीमुळे शेतातील कामे ठप्प ; वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष !
मोर्शी :- सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मोर्शी तालुक्यात घोडदेव डोंगर यावली परीसरात बिबट्याची दहशत इतकी पसरली आहे की, अनेकांना शेतीमध्ये कामे करणे कठीण झाले आहे. डोंगर यावली घोडदेव परिसरात मागील १ महिन्यापासून या बिबट्याने आपला धुमाकूळ घातला असून आतापर्यंत विविध शेतातील पाळीव जनावरांवर हल्ला करून ३ गाईंची शिकार केली असून दिनांक १९ मे रोजी उमेश व्यास यांच्या घोडदेव येथील शेतातील गोऱ्हाची केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी वन परिक्षेत्र अधिकारी मोर्शी यांना दिली असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची उपाय योजना केल्या गेली नसल्यामुळे बिबट्याने पुन्हा दिनांक २७ मे रोजी नोव्हेंबर रात्री ९ वाजताच्या सुमारास डोंगरयावली परिसरामध्ये अरुण राउत यांच्या शेतात बिबट आढळुन आला असून बिबट्याने त्यांच्या शेतातील गाईच्या वासरावर हल्ला केला असता त्यामध्ये ते जखमी झाले असून गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्या गाईच्या वासराचे प्राण वाचले.
बिबट्याने हल्ला करून गाईचे वासरू जखमी केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले परिसरातील शेतातील सर्व शेतकरी व शेकडो शेतमजूर भीतीपोटी शेतातील सर्व कामे सोडून आपली जनावरे घेऊन जीव मुठीत घेऊन गावाच्या दिशेने पळत निघाले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली असून घोडदेव डोंगर यावली परिसरात वास्तव करणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा व बिबट्या मिळेपर्यंत संपूर्ण परिसरात पिंजरे लाऊन वन विभागाने गस्त सुरू ठेवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
शेतकऱ्यांमध्ये बिबट्या व चोरट्यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या भीतीमुळे शेतातील मोटार पंप , केबल शेतीतील इतर मौल्यवान साहित्य, व शेतमाल मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या घटनेचा फायदा घेऊन चोरटे सुद्धा आपली दिवाळी साजरी करू शकतात त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करून महावितरण कंपनीने घोडदेव डोंगर यावली दापोरी परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील बंद असलेली सिंगल फेज लाईन तत्काळ सुरु करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी वन विभागाच्या व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
वन विभागाने शेतकऱ्यांवर हल्ला होण्याची वाट पाहू नये !
घोडदेव परिसरात बिबट्या राहत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर दिवसेंदिवस हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. या अगोदर ही ३ ते ४ जनावरांची शिकार या बिबट्याने केली. ही बाब वन विभाग यांना माहिती आहे. मात्र, त्यांच्याकडून या गंभीर घटनेवर कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. त्यानंतर काल एका जनावराला जखमी केल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे भविष्यात बिबट्या माणसांवर हल्ला करू शकतो अशी भीती परिसरातील शेतकऱ्यांना वाटत असल्यामुळे शेतकऱ्यांवर हल्ला होण्याआधी वन विभागाने या बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा
– रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.