– दिव्यांग साहित्य वितरण सोहळा
– ५०० हुन दिव्यांग बांधवांनी घेतला लाभ
चंद्रपूर :- दिव्यांग बांधवांमध्ये असामान्य प्रतिभा आणि सामर्थ्य असते.सर्वसामान्यांप्रमाणे दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्याचा प्रवास साधारण नसतो. मात्र, परिस्थितीवर दुःख व्यक्त करत आयुष्य घालवत बसण्यापेक्षा परिस्थिती स्वीकारून त्यावर मार्ग काढणे आवश्यक आहे. विविध आव्हानांचा सामना करत जिद्दीने पुढे जाण्याची त्यांची इच्छा संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायक प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रियदर्शिनी सभागृह येथे गुरुवार २६ सप्टेंबर रोजी दिव्यांग साहित्य वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ५०० हुन अधिक दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले. व्हील चेअर्स, कमोड ,वॉल्कर, श्रवणयंत्र,युरीन पॉट,कुबड्या,एल्बो स्टिक, अंध व्यक्तींकरिता पांढरी काठी अश्या दिव्यांगांना रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भेलावे, श्री माता महाकाली महोत्सव समीतीचे सचिव अजय जैयसवाल आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, स्वतःच्या अंगी असलेल्या आत्मविश्वासाच्या ताकदीवर स्वत:ला सिद्ध करत एक हाती यश कसे खेचून आणता येते. याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे पॅराऑलपिक्स मध्ये आपल्या दिव्यांग बांधवांनी केलेली कामगिरी होय. आज जे साहित्य दिव्यांग बांधवांना दिले जात आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्याला एक नवा दृष्टिकोन मिळण्यास मदत मिळणार आहे. या साहित्याने ते आपल्या क्षमतेनुसार कार्य करू शकतील.
राज्यसरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. शिक्षण, रोजगार, आणि आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत. याचाही दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा. शहरात एकही दिव्यांग बांधव साहित्याविना राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास, त्या जागेवर आपण दिव्यांग बांधवांना ‘अम्मा की दुकान म्हणून दुकान उपलब्ध करून देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी बोलताना मनपा आयुक्त विपिन पालिवाल म्हणाले की, आमदार महोदय यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आज येथे दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप होत आहे. त्यांच्या सहकार्याने विविध आरोग्य शिबिरे घेण्यात आली आहेत. दिव्यांगांना हक्काचे घर मिळण्याची जी अपेक्षा आमदार महोदयांनी व्यक्त केली आहे त्यासाठी शासनाच्या योजनेंतर्गत त्यांना घर देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दिव्यांगांना स्वतःचा रोजगार सुरु करण्यासाठी बँकेतर्फे मंजुर कर्जाच्या ५० टक्के किंवा ज्यास्तीत ज्यास्त १ लक्ष रुपये अनुदान मनपातर्फे दिले जात असुन या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.