महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
● तब्ब्ल २५० किलो रंग वापरून कलाकारांनी केवळ ४ तासात साकारली रांगोळी
नागपूर :- २२ एप्रिल हा वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाच्या निमित्ताने नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी इंटरचेंज येथे ७६८ चौरस फुट एवढी भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. संस्कार भारती तर्फे साकार झालेली हि रांगोळी पर्यावरण सुरक्षेचा संदेश देते.
हि रांगोळी साकार करायला संस्कार भारतीचे १५ कलाकार सलग ४ तास झटले. “पर्यावरण की रक्षा, दुनिया की सुरक्षा” हे ब्रीदवाक्य येथे रेखांकित केले आहे. हि रांगोळी साकार करायला कलाकारांना २५० किलो रंग लागला. मेट्रो प्रवाश्यांना २५ एप्रिल पर्यंत हि रांगोळी बघता येईल.
दर वर्षी २२ एप्रिल वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण रक्षणा संबंधी जण सामन्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो. २२ एप्रिल १९७० रोजी हा दिवस सगळ्यात पहिल्यांदा साजरा करण्यात आला आणि त्यानंतर दर वर्षी जगात सर्वत्र या दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
संस्कार भारती तर्फे गजानन रानडे यांच्यासह दिपाली हरदास, राधा कावडे, सुप्रिया देशमुख, हर्षल कावरे, श्रीकांत बंगाले, पुजा बोडखे, सुमीत ढोरे व इतर कलावंतांनी हि कलाकृती साकार करण्याकरता परिश्रम घेतले.