मुंबई :- नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा शासकीय यंत्रणेने पूर्णतः नियोजन करून आयोजित केला होता. या पुरस्कार प्रदान सोहळ्या दरम्यान अनुयायांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांची एक सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.
नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघाताने नागरिकांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी विधानसभा सदस्य सुनिल प्रभू, जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्या दरम्यान १४ श्री अनुयायांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली होती. या समितीच्या विनंती वरून समितीला दि.१३ जुलै, २०२३ च्या शासन निर्णयानुसार एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याची कार्यवाही एक सदस्य समितीमार्फत सुरू आहे. मृत्यू झालेल्या १४ व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे ७० लाख रूपये इतके अर्थसाह्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक विशेष बाब म्हणून करण्यात आले आहे, अशीही माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली.