वर्धा : आज पुन्हा एका मोठ्या अधिकाऱ्याला सुमारे 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. वर्ध्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या चमुने आज सकाळी साडेअकरा वाजता ही कारवाई केली. काहीच दिवसांपूर्वी वर्ध्याचे उपजिल्हाधिकारी विजय सहारे यांना 40 हजार रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा मोठ्या अधिकाऱ्याला लाच घेतांना अटक केल्याने जिल्ह्यातील लाचखोर अधिकाऱ्यांत भिती निर्माण झाली आहे. कार्यकारी अभियंता प्रकाश बुब यांनी बिल काढून देण्याकरिता आशिष गोस्वामी यांच्याकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. यातील 1 लाख आज देण्याचे ठरले होते. आज बुब यांच्या शासकीय निवासस्थानी ही रक्कम स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने रंगेहात अटक केली. याचवेळी घेतलेल्या घर झडतीत बुब यांच्या घरातून सुमारे 6 लाख 40 हजारांची रोख जप्त केली. ए. सी. बी. देवराव खंडेराव, संतोष बावनकुळे, प्रदीप कुचणकर, प्रशांत वैद्य, प्रीतम इंगळे, प्रशांत मानमोडे यांनी ही कारवाई केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेल्या झाडांचे 50 लाखांचे बील आशिष गोस्वामी यानी सादर केले होते. हे बील काढून देण्याकरिता बुब यांनी बिलातील 5 टक्के रुपयांची म्हणजेच (अडीच लाख)रूपयाची मागणी केली केली होती. कार्यकारी अभियंता प्रकाश बुब हे आर्णी (जिल्हा यवतमाळ) येथील मूळ रहिवासी असून त्यांनी आर्णी आणि यवतमाळ येथे मोठी संपत्ती गोळा केली असून त्या संपत्तीची चौकशी केली जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब ए.सी.बी. जाळ्यात 1 लाखाची लाच घेतांना अटक, तर घर झडतीत 6 लाख 40 हजारांची आढळली रोख
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com