रेगडी येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन
गडचिरोली :- महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री,डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते रेगडी, ता.चामोर्शी येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळेच्या मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी त्यांनी डीटीसी सह धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रत्येक आदिवासी समूहातील मुला मुलींना शालेय शिक्षण मिळालेच पाहिजे असे प्रतिपादन केले.
दुर्गम भागात काही कुटुंबातील मुले शाळांमधे येत नाहीत. जर सर्व ग्रामीण मुले शिकली तर ती मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल. आता आदिवासी विभागांतर्गत येणाऱ्या शाळांमधे अनेक चांगल्या सुविधा देत आहेत. शिक्षकांनी पुढाकार घेवून मुलांना चांगले शिक्षण द्यावे व त्याचबरोबर आदिवासी विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहितीही त्यांना द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या भुमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार डॉ.देवराव होळी, अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर रविंद्र ठाकरे, प्रकल्प अधिकारी डॉ.मैनक घोष, अधीक्षक अभियंता आदिवासी विकास विभाग उज्ज्वल डाबे, कार्यकारी अभियंता वर्षा घुसे, उपायुक्त आदिवासी विकास दशरथ कुळमेथे, रेगडी सरपंच मोहिता लेकामी उपस्थित होते.
यावेळी आदिवासी विकास मंत्री, गावीत यांनी आश्रमशाळेतील मुलांशी संवाद साधला. मिळत असलेल्या शिक्षण सुविधांबाबत त्यांनी विचारपूस केली. यावेळी शाळेची, वसतिगृहाची व किचनची पाहणी केली. भूमिपूजन कार्यक्रमात आमदार देवराव होळी यांनी आपल्या मार्गदर्शनात शाळेतील पटसंख्येबाबत वाढ होणे आवश्यक असल्याबाबतचे मत व्यक्त केले. तसेच उपस्थित शालेय कर्मचाऱ्यांना सुविधांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष कन्नाके, प्रकल्प कार्यालय गडचिरोली यांनी केले तर आभार निलय राठोड, सहायक प्रकल्प अधिकारी यांनी मानले.