नागपूर :- ज्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे, त्यांनी नागपूरसह विदर्भाची गरज आणि क्षमता ओळखून संशोधनाची दिशा ठरवावी. आयात कमी करणारे, निर्यातीची क्षमता वाढविणारे आणि भविष्याचा वेध घेणारे संशोधन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी (शनिवार) येथे केले.नॅशनल रुरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च सोसायटीच्या सूर्योदय कॉलेज अॉफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘टेक्नो पार्क’चे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी भावी अभियंत्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाला मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी, माजी आमदार सुधाकर कोहळे, दीपक चाफले, रणजित चाफले, प्राचार्य बी.जी. अरजपुरे, मुख्याधिकारी पी.जी. पराते, व्यवस्थापकीय संचालक रसिका चाफले यांची प्रमुख उपस्थिती होती. गडकरी म्हणाले, ‘ज्ञान ही खूप मोठी शक्ती आहे आणि या ज्ञानातून वैभव निर्माण करणे हीच काळाची गरज आहे. त्यामुळे जे विद्यार्थी इंजिनिअरिंग करीत आहेत, त्यांना आपल्याला कोणत्या तंत्रज्ञानाची आणि संशोधनाची गरज आहे, हे ओळखता आले पाहिजे. प्रदेशात उपलब्ध पायाभूत सुविधा, रॉ मटेरियल आणि प्रदेशाची गरज व क्षमता ओळखून संशोधनाची दिशा ठरवावी लागेल. नागपूरसह विदर्भात कोळसा खाणी आहेत. महाराष्टात ८० टक्के खनिजे विदर्भातून जातात. महाराष्ट्रातील ७५ टक्के जंगल विदर्भात आहे. नागपूर तर संत्र्याची राजधानी आहेच, शिवाय टायगर कॅपिटल म्हणूनही आपली ओळख आहे. विदर्भाच्या या क्षमता ओळखून आणि याशिवाय असलेल्या उणिवा ध्यानात ठेवून आपण संशोधन करणे काळाची गरज आहे.’ कुठलाही उद्योग करताना योग्य तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार्यता (इकॉनॉमिक व्हायबिलिटी), कच्च्या मालाची उपलब्धता आणि बाजारपेठ या गोष्टी डोळ्यापुढे ठेवणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. आपल्या नागपुरात डसॉल्ट राफेल २५० फायटर जेट तयार करीत आहे. भारत सरकार हे खरेदी करणार आहे. येत्या काळात आपण उत्तम तंत्रज्ञान वापरून याची निर्यात देखील करू शकतो, असेही गडकरी म्हणाले.
महाविद्यालयांची जबाबदारी
नागपुरात ४९ इंजिनियरिंग कॉलेजेस आहेत. त्यांनी रोजगाराची क्षमता वाढविणारे शिक्षण देण्याची गरज आहे. नागपुरात सर्व प्रकारचे तांत्रिक आणि कौशल्याधारित शिक्षण मिळाले तर रोजगाराची दालने खुली होतील. उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ हवे आहे. ही गरज महाविद्यालयांनी ओळखली पाहिजे.