नागपूर :- एसंबा येथील गुप्ता कोल वॉशरीजमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे शेतपिकांचे सर्वेक्षण करुन यादी अंतिम झाल्यावर राष्ट्रीय प्रतिसाद निधीच्या सुधारित निकषांच्या आधारावर दुप्पट नुकसान भरपाई वॉशरीजने बाधित शेतकऱ्यांना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिले.
गुप्ता कोल वॉशरीज,एसंबा यांच्यामुळे गोंडेगाव येथे होणारे प्रदुषण व नुकसानीमुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी तहसील कार्यालय, पारशिवनी येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळीते बोलत होते. उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार प्रशांत सांगळे, वराडाच्या सरपंच विद्या चिखले, पोलीस निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी, गुप्ता कोल वॉशरीजचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
एसंबा गुप्ता कोल वॉशरीजमुळे वाहणारे दुषित पाणी व ॲश धूळीकणामुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे शेतपिकांचे सर्वेक्षण करण्याबाबत पारशिवनी तहसीलदार यांना निर्देश देण्यात आले. संबंधित तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांचे पथक तयार करुन एसंबा व वराडा गावातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्या भागाचे सर्वेक्षणसह अचुक यादी दहा दिवसात तयार करुन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
एसंबा येथील गुप्ता कोल वॉशरीजमुळे होणाऱ्या प्रदुषणाची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळांनी संपूर्ण तपासणी करुन प्रदुषण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचवाव्या. मंडळाने सूचविलेल्या उपाययोजना तत्काळ कंपनी प्रशासनाने अमलात आणाव्यात. या सुधारणा झाल्या किंवा नाही याची तपासणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
गुप्ता कोल वॉशरीज लगतच्या नाल्यामध्ये पावसामुळे पाणी जमा होवून आजुबाजुच्या शेतामध्ये पसरते. त्यासोबतच नाल्यावर अतिक्रमण झाल्याचे दिसूनआले. नाला बंद झाल्यामुळे व वराडा गावाजवळ कोळसा खदानीने मुरुमाचे ढिगारे तयार केल्याने तेथील नैसर्गिक नाले बंद झाले आहेत. कोळसा खदान प्रशासनाने तहसीलदार व उपअधिक्षक भूमि अभिलेख यांच्यामार्फत नाल्याचे मोजणी करुन नाला खोलीकरणाचे काम करावे. ही जबाबदारी कोळसा खदान व कोल वॉशरीज यांनी संयुक्तपणे पार पाडावी. नाला खोलीकरणाचे काम पुढील हंगामाच्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.