वीज उत्पादन पूर्ववत करण्यासाठी युद्धस्तरीय उपाययोजना
फायर ऑडीट होणार
नागपूर : महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात ८ डिसेंबर रोजी २१० मेगावाट परिसरात कोळसा वाहून नेणाऱ्या कन्व्हेयर बेल्टला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जामंत्री नामदार डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. या केंद्रातील विद्युत विषयक (ईलेक्ट्रिल) आणि अग्नीसुरक्षा विषयक (फायर) ऑडिट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
याप्रसंगी महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश खंडारे, मुख्य अभियंता राजू घुगे प्रामुख्याने उपस्थित होते.
“आग लागण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती आणि संस्थांची मदत घ्या, आगामी दहा दिवसांत अहोरात्र काम करून दोन पैकी एक कन्व्हेयर बेल्ट पूर्ववत करून वीज उत्पादन सुरळीत करण्याचे त्यांनी निर्देश दिले. सोबतच विद्युत आणि अग्निशमन विषयक तातडीने अंकेक्षण करून घ्या. यासाठी नॅशनल फायर महाविद्यालयाची मदत घ्या,”
अशा सूचना डॉ. राऊत यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
अशापद्धतीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, सुधारणात्मक बाबी आणि दीर्घकालीन उपाययोजना म्हणून संचालकस्तरीय एक समिती गठीत करण्याच्या सूचना त्यांनी महानिर्मिती व्यवस्थापनाला दिल्या.
प्रारंभी मुख्य अभियंता राजू घुगे यांनी आगीचा घटनाक्रम विषद केला तर संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी लवकरात लवकर वीज उत्पादन पूर्ववत करण्यासाठीच्या युद्ध्स्तरीय नियोजना संदर्भात भूमिका मांडली.
याप्रसंगी मुख्य अग्निशमन अधिकारी तथा सल्लागार शशिकांत पापडे, उप मुख्य अभियंते शरद भगत, अरुण पेटकर, प्रफुल्ल कुटेमाटे, जितेंद्र टेंभरे, अधीक्षक अभियंते डॉ.अनिल काठोये, संजय पखान, संजय तायडे, विश्वास सोमकुंवर तसेच वीज केंद्राचे संबंधित अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते